चुल्हाड (सिहोरा) : ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ग्राम पंचायत मधून संगणकीकृत दस्तऐवज देण्यात येत आहेत. यात नागरिकांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे. हे दस्तऐवज बंद करण्याचा निर्णय सिहोरा परिसरातील बहुतांश ग्रामपंचायतींनी घेतला असून गावकऱ्यांना न्याय मिळणार आहे.राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने ग्राम पंचायतींना हायटेक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम पंचायतींना संगणक पुरवठा करण्यात आलेला आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे संगणक शो पीस झाली आहेत. अनेक ग्राम पंचायतीमध्ये विजेची सोय नाही. यामुळे संगणक धुळखात आहेत. याशिवाय आॅपरेटरच्या घरीच अनेक संगणक आहेत. दरम्यान विज कनेक्शन घेण्यास ग्राम पंचायती पुढाकार घेत नाहीत. ग्राम पंचायतींना बिगर घरगुतीच्या आधारावर वीज पुरवठा करणारे कनेक्शन विज वितरण कंपनी उपलब्ध करीत आहे. यामुळे अल्प उत्पन्न असणाऱ्या ग्राम पंचायती विज जोडणी पासून दोन हात दूर आहेत. दरम्यान ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना संगणकीकृत दस्तऐवज उपलब्ध केले जात आहेत. यात रहिवाशी दाखला, दारिद्रय रेषेखालील यादी क्रमांकाचा दाखला तथा अन्य दस्तऐवजाचा समावेश आहे. या प्रत्येकी दस्तऐवजाचे २५ रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. सरासरी ३ दस्तऐवजाचे ७५ रूपये गावकरी मोजत आहेत. यामुळे नागरिकांवर अतिरिक्त भुर्दंड बसत आहे. या दस्तऐवजांना गावकरी विरोध करीत आहेत. संगणक संचालित करणारे आॅपरेटर हे ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध राहत नाही. त्यांचा अधिक वेळ पंचायत समितीमध्ये आयोजित बैठकीत जात असल्याने, असे दस्तऐवज प्राप्त करण्यासाठी गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.या संगणकांना इंटरनेटने जोडण्यात आल्याचा मोठा उदोउदो करण्यात येत आहे. परंतु सिहोरा परिसरात तांत्रिक अडचणीमुळे संगणक आॅपरेटर सैरवैर झाली आहेत. ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक आॅपरेटर अन्य संगणक केंद्रमधून अडचण दुर करीत आहेत. याकरीता स्वत: अतिरिक्त पैसे मोजत आहेत. (वार्ताहर)
संगणकीकृत दस्तऐवज बंद करणार
By admin | Updated: June 25, 2014 23:35 IST