विहीरगाव येथील घटना : पित्याला पोलीस कोठडीभंडारा : मद्यधुंद मुलाने विद्युत कनेक्शन तोडून आई-वडिलांसह घरातील मंडळीला अर्वाच्य शब्दात शिविगाळ केली. यामुळे संतापलेल्या बापानेच गळा आवळून मुलाचा खून केला. ही घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील विहिरगाव येथे घडली. चंद्रहास ज्ञानेश्वर फुंडे (१९) असे मृताचे नाव आहे. पालांदूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विहिरगाव येथे ज्ञानेश्वर पंढरी फुंडे (४३) हे कुटूंबासह वास्तव्य करतात. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा चंद्रहास हा मद्यप्राशन करुन घरी आला. त्यानंतर आईवडिल, आजोबांना अश्लिल शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने मारहाण सुरू केली. त्यानंतर घरातील लार्इंटिग तोडली. त्यामुळे घरात अंधार झाला. हा प्रकार रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहिला. मद्यधुंद मुलाच्या या प्रकारामुळे वडिल प्रचंड संतापले. त्यानंतर घरातील मंडळींनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या वडिलाने त्याच्या नाकावर जोरदार बुक्की मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर जवळच असलेल्या नॉयलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विहिरगावचे पोलीस पाटील प्रल्हाद कोचे यांनी पालांदूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर विरूद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज सोमवारला लाखनी न्यायालयात हजर केले असता ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक एच.एम. सैय्यद व सहायक उपनिरीक्षक अनिल नंदेश्वर करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
जन्मदात्याने केला मुलाचा खून
By admin | Updated: August 25, 2014 23:47 IST