करडी (पालोरा) : शासनाच्या करोडो खर्चाच्या प्रादेशिक पाणी पुरवठा आणि गावातीलल योजना आज तोट्यात आहेत. नेहमी पाणीटंचाईची स्थिती असते. नागरिकांची ओरड असते. मात्र कान्हळगाव (मुंढरी बु.) येथील योजना अपवाद ठरली आहे. सन २०११-१२ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ५८लाखाची योजना १७.५० लाखात पूर्ण झाली. सरपंच, उपसरपंच व कमेटी यांचे नियोजन व अंमलबजावणी त्यासाठी महत्वाची ठरली. दोन वर्षापासून सुरू असलेली योजना नफ्यात असून १०० टक्के पाणी व वसुली करण्यात ग्रामपंचायतीला यशश आले आहे. मुंढरी जि.प. क्षेत्रातील कान्हळगाव गावची लोकसंख्या १००० आहे. गाव वैनगंगेच्या अगदी काठावर वसलेले आहे. वैनगंगेच्या दुषित पाण्यामुळे नेहमी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण व्हायची. त्यावर उपाय योजना म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत राष्टÑीय पेयजल योजनेंतर्गत ५८ लाखाची पाणी पुरवठा योजना गावासाठी मंजूर करण्यात आली. अंदाज पत्रकातील कामांचा खर्च लक्षात घेताा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच दिगांबर कुकडे, उपसरपंच योगेश्वर रोडके व ग्रामपंचायत कमेटीने योजनेच्या यशस्वीतेवर व येणार्या देखभाल दुरुस्ती आणि अन्य खर्चावर प्रश्न उपस्थित केला. गावाला योजना पेलवणारी नाही असे नमूद करीत विरोध दर्शविला. पुन्हा नव्याने अंदाजपत्रके तयार होऊन कमी खर्चाचे नियोजन तयार केले गेले. ग्रामपंचायतीच्या नियोजनात देखरेखीत व अंमलबजावणीत ५८ लाखांची योजना फक्त १७,४३,१९४ रुपयात तयार झाली. त्यामध्ये पाण्याची टाकी, २ किमी वितरण पाईप लाईन, ५०० मीटर लांबीची मुख्य पाईप लाईन, विहिर ऐवजी बोरवेल्स खोदली गेली. एक स्विच रुम आदी कामांचा समावेश आहे. योजना लहान असल्याने देखरेख व दुरुस्तीच्या खर्चात मोठी कपात झाली. खर्चात बचत झाली. आज शून्य खर्चावर योजना सुरू आहे. गावातच बोरवेल्स, पाण्याची टाकी व २ कि.मी.चे पाणी वितरण जाळे असल्याने विजेच्या बिलात मोठी बचत झाली. योजनेवरील खर्च कमी होऊ लागल्याने योजना सन २०११-१२ पासून सतत नफ्यात सुरू आहे. नफ्यात सुरू असलेली जिल्ह्यातील ही एकमेव योजना ठरु पाहत आहे. (वार्ताहर)
नफ्यात सुरू असलेली पाणीपुरवठा योजना
By admin | Updated: May 11, 2014 23:15 IST