गतवर्षी लॉकडाऊन काळात केशकर्तनालयातील दुकानदार आणि कारागिरांचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊन झाल्यानंतर केशकर्तनालयाची दुकाने उघडली गेली नाही. आता या व्यावसायिकांकडे असलेली जमापुंजी संपली आहे. त्यामुळे पुढील काळात कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. यातून संपूर्ण जिल्ह्यात दुकानदारांनी शासनाचा निर्णय परत घेण्याची मागणी केली आहे. अनेक व्यावसायिकांकडे स्वत:चे दुकान नाही, तर या ठिकाणी मोठ्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची संख्या सर्वात मोठी आहे. या कारागिरांना केशकर्तनाशिवाय दुसरा रोजगार तत्काळ उपलब्ध होणे अवघड आहे. यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या कारागिरांवर आणि दुकानदारांवर मोठे संकट ओढवले आहे. हे संकट निवारण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
भाडे निघणेही होत आहे अवघड
गतवर्षी सर्वाधिक फटका दाढी-कटिंगच्या दुकानाला बसला. दुकान मालकाने बंद काळातही दुकानाचे भाडे वसूल केले. या काळात विजेचे बिल मोठ्या प्रमाणात आली. ही उधारी अद्यापही पूर्ण करता आलेली नाही. आता नव्याने लॉकडाऊन आले.
कोट
आता घर कसे चालवायचे?
दुकानाच्या उत्पन्नातून संपूर्ण घर चालत होते. गतवर्षी वाईट अनुभव राहिला, यानंतरही मोठ्या जोमाने कामाला सुरुवात झाली. आता २५ दिवसांचा बंद राहणार आहे. या काळात जगायचे कसे?
-जगदीश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ
गतवर्षी असे लॉकडाऊन जाहीर झाल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. यामुळे मी दुकानाचे काम सोडून गावाकडे स्थायिक झालो, आता पुन्हा या व्यवसायावर अवकळा आली आहे.
तारेश मौदेकर, दुकानदार
घर चालविता येईल इतकी ताकद राहिली नाही. आमच्याकडची जमापुंजी संपली आहे. अशा परिस्थितीत कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न आमच्या सर्वांपुढे उभा आहे.
गणेश जांभूळकर, दुकानदार
जिल्ह्यातील संपूर्ण दुकानदारांची अवस्था अतिशय वाईट आहे. आम्हाला किमान काही तासांसाठी दुकान चालविण्याची वेळ द्यावी, तरच आमच्या घराचा गाडा चालविता येईल. यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी आम्ही चालविली आहे, प्रशासनाने त्याचा फेरविचार करावा.
- रवि लांजेवार, जिल्हाध्यक्ष, नाभिक युवा मंच, भंडारा
९१०० जिल्ह्यातील एकूण केशकर्तनालये
१५,७२० केशकर्तनालयातील कामगारांची संख्या