भंडारा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमध्ये मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे. नाव नोंदणी करण्यासाठी आता मर्यादित कालावधी असल्याने मतदारांनी आपले नाव तात्काळ मतदान यादीत नोंदवावे, असे आवाहन अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ नंतर ९ ते ३० जून, २०१४ या कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कालावधीनंतर देखील मतदार नोंदणीचा कार्यक्रम सतत सुरू आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर एकूण २२ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. लवकरच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार असून ज्या मतदाराचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंद आवश्यक त्या कागदपत्रांसह करावी. मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करून घ्यावी. मतदार यादीत नाव नसेल तर अशा मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना-६ अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा मतदार मदत केंद्रामध्ये जाऊन भरावा. विधानसभेसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करता येईल. ज्या नागरिकांकडे जुने मतदार ओळखपत्र आहे परंतु त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही किंवा वगळले आहे अशा नागरिकांनी त्यांच्या सामान्य रहिवासाचा पत्ता मतदार ओळखपत्राप्रमाणेच असल्यास जुन्या मतदार ओळख पत्राच्या नमुना-६ अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यांना इतर पुरावे सादर करण्याची गरज राहणार नाही. (प्रतिनिधी)
मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन
By admin | Updated: September 6, 2014 23:33 IST