बपेरा सीमेवर तपासणी नाका : हरदोली वनउपज तपासणी नाक्याचे औचित्य काय? रंजित चिचखेडे चुल्हाड (सिहोरा) तुमसर-बपेरा राज्य मार्गावर वन विभागाचे बपेरा आणि हरदोली गावात वन उपज तपासणी नाका कार्यरत आहे. एकाच मार्गावर १३ किमी अंतरावर हे दोन नाके आहेत. जीर्ण इमारतीतून प्रशासकीय कारभार सुरू आहे. मध्यभागी असणाऱ्या हरदोली वन उपज तपासणी नाक्याचे औचित्य काय? असा सवाल उपस्थित होतो. सिहोरा परिसरात राखीव वनाचे वाढते क्षेत्र आहे. यामुळे बपेरा गावात नव्याने क्षेत्र सहायक कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. याच आंतरराष्ट्रीय सिमेवर वन उपज तपासणी नाका सुरु करण्यात आला असून रिक्त पदे असल्याने प्रशासकीय कारभार चौपट झाला आहे. एकाच कर्मचाऱ्याचे मानगुटीवर २४ तासाची सेवा सोपविली जात आहे. यामुळे रात्रकालीन वाहनाची तपासणी अडचणीत येत आहे. तपासणी नाक्यावर तीन कर्मचाऱ्यांची गस्त असताना २ कर्मचारी कार्यरत आहेत. यात एका महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तपासणी नाका आंतर राज्यीय सिमेवर असल्याने या नाक्याला अनन्य साधारण महत्व आहे. मध्यप्रदेश तथा अन्य राज्यातून दाखल होणाऱ्या वाहनाची तपासणी याच सिमेवर करण्यात येत आहे. पंरतु याचे कार्यालयात अनक समस्या आहेत. कर्मचाऱ्यांना वास्तव्य करणारी वसाहत जीर्ण झाली आहे. या इमारतीला साधे दरवाजे नाहीत. अन्य सुविधांचा थांगपत्ता नाही. यामुळे या कार्यालयात नव्याने कर्मचारी रुजू होण्यास टाळाटाळ करित आहेत. बपेरा क्षेत्र सहायक कार्यालय अंतर्गत राखीव वनात वाघ व अन्य वन्यप्राण्यांची वाढती संख्या आहे. याशिवाय घनदाट जंगलात असणारा वन विभागाला नुकसानदायक सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचा धरणमार्ग मध्यप्रदेश राज्याला जोडणारा मार्ग आहे. बपेरा सिमेवर वन विभाग व पोलिसांचा तपासणी नाका असल्याने अवैद्य व्यवसायीकांनी धरण मार्ग वाहनाची वर्दहीसाठी निवडला आहे. रात्र आणि दिवस याचे धरण मार्ग वरुन वाहनाची रेलचेल वाढली आहे. विस्तारलेला जंगल धरण पर्यंत असल्याने वन्य प्राण्यांची शिकार करणारे यात मार्गाने पळून जात आहेत. याशिवाय वृक्षतोड करणारे माफीया यांचे मार्गावर उपयोग करीत आहेत. वन विभागाचे हद्दीय धरण मार्ग असल्याने वन विभागाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज आहे. सायंकाळ ते सकाळपर्यंत धरण मार्ग बंद करण्याची ओरड सुरु झाली आहे. या धरणावर लोखंडी गेट लावण्याची आवश्यकता आहे. दिवसभर धरण मार्गावर एका कर्मचाऱ्याची वाहनाची नोंद व तपासणी करण्यासाठी नियुक्ती केल्यास अवैध वाहतुकीवर आडा घालण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. या शिवाय मध्यप्रदेशातील जंगलात शिरकाव करणाऱ्या शिकारी व वेड्याचे धाबे दणानणार आहेत. नाकाडोंगरी, कवलेवाडा, हरदोली, तुमसर, बपेरा गावात वन विभागाचे तपासणी नाके आहेत. यामुळे राज्य मार्गावरुन पळवाट शोधताना शिकाऱ्यांना भितीदायक असल्याने धरण मार्ग रामबाण व सुरक्षित मार्ग ठरत आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील मध्यभागी हरदोली गावात वन उपज तपासणी व क्षेत्र सहायक कार्यालय आहे. या कार्यालयात कुणी सेवा बाजवत नाही. इमारत जिर्ण झाली आहे. या वनउपज तपासणी नाक्याचे महत्व नाही. बपेऱ्यात वन उपज तपासणी नाक्यावर वाहनाची खातरजमा झाल्यानंतर हरदोलीत वाहने तपासवण्याची आवश्यकता शिल्लक राहत नाहीत. यामुळे कार्यरत कर्मचारी तपासणी नाका सोडून जंगल परिसरात सेवा बजावित आहेत. या कार्यालयाचे आधी महत्त्व होते. पंरतु बपेऱ्यात कार्यालय मंजूर झाल्याने हरदोली कार्यालयाची जबाबदारी कमी झाली आहे. यामुळे या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांची नियुक्ती धरण मार्गावर करण्याची ओरड परिसरात सुरु झाली आहे. समित्यांचे महत्त्व वाढणार ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचा विकास इक्को टुरिझम करण्यात आले आहे. पर्यटन स्थळ आणि परिसराचा विकास करण्यासाठी ड्रोनमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. पर्यटन स्थळाचा विकास करतांना कोट्यावधी निधी प्राप्त होणार आहे. या शिवाय वन व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी ग्राम व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आले आहे. विकास निर्माण करण्यासाठी मोठी जबाबदारी येणार आहे. पंरतु पर्यटन विकासावर अंमलबजावणी करणारे निर्देश समिती व विभागाना अद्याप प्राप्त झाले नाही अशी माहिती मिळाली आहे.
जीर्ण इमारतीतून प्रशासकीय कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 00:51 IST