देवानंद नंदेश्वर भंडारापावसाळा सुरू होऊनही पावसाला सुरूवात न झाल्यामुळे ग्रामीण भागासोबत शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डोके वर काढू लागला आहे. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पामध्ये केवळ २२.५४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाचे मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतीसोबत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण उभी ठाकली असून विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश बोअरवेलला असलेले दूषित पाणी, पाणी पुरवठा योजनेत भारनियमनामुळे असलेली अनियमितता यामुळे ग्रामीण जनता पिण्याच्या पाण्यासाठी हैराण झाली असून पिण्याच्या पाण्याकरिता झुंबड उडत आहे.जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ २२.५४ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागीलवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात सहा टक्क्यानी वाढ झालेली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी १८़७२, बघेडा ९९़१८, बेटेकर बोथली ३३ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा २४ टक्के आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १८़४० टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा २०.१० टक्के आहे़ गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ असे असले तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ २७़४४३ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी दि़ ३ जुलै रोजी ६३ प्रकल्पात ३४़९५८ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी २८़७२ एवढी होती. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे एैन पावसाळ्यात जनावरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.
६३ प्रकल्पात केवळ २२ टक्के जलसाठा
By admin | Updated: July 5, 2014 00:14 IST