रक्तदान दिन आज : नऊ महिन्यात सहा हजार ६७९ रक्त पिशव्यांचे संकलनदेवानंद नंदेश्वर भंडाराभंडारा : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीतून ९ महिन्यांमध्ये ३७१ सिकलसेलग्रस्तांना रक्ताचा नि:शुल्क पुरवठा करण्यात आला. थॅलेसिमिया रुग्णांसाठी ३७८, तसेच ब्लड आॅन कॉल अंतर्गत ५८७ रुग्णांना रक्तपिशव्या देण्यात आले़ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीअंतर्गत ९ महिन्यांमध्ये १२० शिबिरे घेण्यात आली़ रक्तासाठी आधी रक्तदानाची अट नसली तरी रक्तदान प्रत्येकाने करायलाच पाहिजे, यासाठी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला प्रोत्साहित केले जाते. सोबतच विविध रक्तदान शिबिरातून रक्तदानाविषयी जनजागृती केली जाते. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे अधिकारी विविध शिबिरांच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व पटवून देत असतात. रक्तगटांपैकी निगेटीव्ह असलेले सर्वच रक्तगट हे दुर्मिळ आहेत. अशा रुग्णांसाठी कधीही रक्ताची गरज निर्माण होत असते. त्यासाठी प्रत्येक निगेटीव्ह गटाचे रक्त रक्तपेढीत राखीव करुन ठेवले जातात. जवळपास तीन टक्के लोक निगेटीव्ह रक्तगटात मोडतात. ओ, ए, बी निगेटीव्ह रक्तगटाची मागणी सारखीच होत असते. कधीकधी यापैकी रक्तगट उपलब्ध राहत नाही. अशावेळी मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होत असते. तेव्हा नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला बोलावून साठा पूर्ण केला जातो. दरवर्षी रक्ताचा पुरवठा नियमित होत असला तरी उन्हाळ्यात मात्र रक्ताची टंचाई जाणवत असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांवर भटकंतीची वेळ येते. मार्च ते जुलै या कालावधीत रक्तदान शिबिर होत नाहीत. याच कारणामुळे रक्ताची टंचाई भासते. हा कालावधी सुट्यांचा, लग्नाच्या धामधुमीचा असतो. अपघातही याच कालावधीत घडतात.रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. मात्र त्याचवेळी रक्तपेढीत रक्त उपलब्ध राहत नाही. परिणामी, रुग्णाचा जीव जाण्याचा धोका अधिक असतो. हा धोका टाळण्यासाठी रक्तपेढीकडून शिबिरांचे आयोजन केले जातात. नियमित रक्तदात्यांना संपर्क करुन रक्ताची व्यवस्था केली जाते. नेमके याचवेळी महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग आवश्यक असतो. परंतु, त्यांचा सहभाग नसतो. रक्ताअभावी रुग्णांचा जीव जाण्याची भीती असते.रक्तदान ही चळवळ होणे गरजेचेसमाजात रक्तदानाबाबत जागृती झाली असली तरी ती पूर्णपणे नाही. आजही रक्तदानाबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे ते रक्तदान करण्यासाठी धजावत नाही. यासाठी रक्तदान ही चळवळ होणे आवश्यक आहे. कालपरवापर्यंत मोजक्या संघटन रक्तदान शिबिरांचे आयोजन करायचे. आता आयोजक वाढले आहेत. या संस्थांकडे प्रत्येक गटाच्या रक्तदात्याची सूची आहे. शहरातील अनेक संस्था नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. काही स्वयंसेवी रक्तदाते दर तीन महिन्यानी स्वेच्छा रक्तदान करतात. नियमित रक्तदान करणाऱ्या संस्थांमध्ये रविंद्रनाथ टागोर युवा मंच, अशोक लेलँड, गणेशपूर उत्सव मंडळ, डॉ.बांडेबुचे, लॉयन्स क्लब तुमसर, श्री संप्रदाय मंडळ, शेप महाबचत, छावा संग्राम परिषद, सिंधी वेलफेअर असोसिएशन आदी संस्थांची नावे आघाडीवर आहेत. रक्तदानासाठी शिबिरे घेतली जातात. परंतु, रक्तदानाविषयी महाविद्यालयीन तरुणांमध्ये कमालीची उदासिनता दिसून येत आहे. कोणत्याही ठराविक वेळेस लोकसंख्येच्या एक टक्के रक्तदान केले तर सर्व रुग्णांची गरज भागू शकते. परंतु, तेवढेही रक्त संकलन होत नाही. शहरातील महाविद्यालयात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आहेत. परंतु, रक्तदानाविषयी ते जागृत नाही. महाविद्यालयीन तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे. -डॉ.मदन काटे, रक्त संक्रमण अधिकारी,जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा.
५,६०६ रक्तपिशव्यातून जीवनदान
By admin | Updated: October 1, 2015 00:54 IST