तलावात ५६ टक्के पाणी : उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकेतभंडारा : जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून हंगाम संपला असून जलसाठ्याची ही स्थिती भविष्यकालीन पाणी टंचाईचे संकेत देणारी आहे. जिल्हा प्रशासनाने वेळेपूर्वीच दखल घेतल्यास त्यावर काही प्रमाणात अंकुश लावता येईल. माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत एकुण ६३ प्रकल्प आहेत. यापैकी मध्यम प्रकल्प चार असून पाण्याचा उपयुक्त साठा ११.२५५ दलघमी आहे. त्याची टक्केवारी २६.२९ इतकी आहे. जिल्ह्यात जुने मालगुजारी तलाव २८ आहेत. त्यामध्ये ५६.२३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे यापैकी एकाही तलावात १०० टक्के जलसाठा नाही. तसेच ७५ टक्क्यापेक्षा जास्त जलसाठा असलेल्या तलावांची संख्या ८ आहे. परिणामी भविष्यात जनावरांसाठीही पाण्याची सुविधा कशी करावी असा प्रश्न उपस्थित होईल यात शंका नाही. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा २१.५१२ दलघमी असून त्याची टक्केवारी ४०.१८ इतकी आहे. या लघुप्रकल्पांपैकी फक्त १ प्रकल्प तुडूंब भरला आहे. तो प्रकल्प लाखनी तालुक्यातील वाकल येथील आहे. ७५ टक्क्यांपेक्षा जलसाठा असलेल्या लघु प्रकल्पांची संख्या चार इतकी आहे. तसेच ९० ते ९९ टक्के जलसाठा असलेला फक्त एक प्रकल्प आहे. पूर्ण ६३ प्रकल्पांची उपयुक्त जलसाठा ४७.०३७ दलघमी असून त्याची टक्केवारी ३८.६४ टक्के आहे.सन २०१४ मध्ये याच दिवशी सर्व प्रकल्पांमध्ये पाण्याची टक्केवारी २४.८१८ दलघमी होती. तर सन २०१५ मध्ये हीच टक्केवारी २४.०६ टक्के इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रकल्पांमध्ये जलसाठ्याची टक्केवारी १४ टक्क्याने वाढली असली तरी भविष्यात पाण्याची टंचाई भासणार हे निश्चित आहे. परतीच्या पावसामुळे या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येते. परंतु परतीचा पाऊस सर्वत्र बरसला नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. धान खरेदी केंद्र सुरु झाले असले तरी भारी धानाची कापणी झालेली नाही. (प्रतिनिधी)
प्रकल्पात ३८ टक्के जलसाठा
By admin | Updated: October 27, 2016 00:26 IST