आठ रूग्णांचा मृत्यू : १७३ रूग्णांचे रक्त तपासणीसाठी पाठविलेभंडारा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. पावसाळ्याच्या दिवसात ३८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जिल्ह्यात ७ जणांचा डेंग्यूने तर एकाचा विषाणूजन्य आजाराने मृत्यू झाला असून १७३ रूग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविले आहे.जिल्ह्यात डेंग्यूने मृत्यू झालेल्यांमध्ये राखी भोयर रा. पालोरा, भूमिता गोटेफोडे रा. परसोडी, काजल रंगारी रा. सानगडी, अतिश उपरीकर रा. पळसगांव, आकांक्षा राऊत रा. धानोड, काजल वैद्य रा. देवाडा, विश्वजीत गोपाल जांभूळकर रा. चिचोली यांचा समावेश आहे. जून ते आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात दुषीत पाणीपुरवठा, घाणकचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्याने यातून अनेक प्रकारचे विषाणूजन्य किटकांची उत्पत्ती होते. पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात अनेकांना विषाणूजन्य आजाराने ग्रासले. जिल्हा आरोग्य विभागाने यातील काहींचे रक्त नमूने घेतले आहे. १७३ रूग्णांचे रक्त नमूने नागपूरला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यातील ३८ रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून तो मृत्यू किटकजन्य आजारामुळे झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायतींमध्ये डेंग्यूची लागण झाली आहे. या गावाच्या ग्रामसेवक व सरपंचांची जनजागृतीच्या संदर्भात जिल्हास्तरावर सभा घेऊन त्यांना डेंग्यूबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती सुरू आहे. यात शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती दिली जात आहे. यासोबतच उपचार शिबीर व गावांमध्ये धूर फवारणी करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)बारव्हा परिसरात तापाची साथबारव्हा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा जैतपूर या गावासह बोथली, धर्मापूरी, खोलमारा, कोदामेळी, तावशी आदी गावात मेंदूज्वर, कावीळ, डेंग्यूसदृष्य आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील पंधरा दिवसापासून बारव्हा परिसरातील गावात तापाच्या तसेच कावीळच्या रुग्णात वाढ झाल्याने खासगी तथा शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना या आजाराची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. अनेक रुग्णांची तपासणी केल्यानंतर सदर रुग्णांमध्ये डेंग्युसदृष्य आजाराची लक्षणे आढळून आली. परिसरातील गावात डेंगूसदृष्य आजाराने कहर केला असून आतापर्यंत ९.१० जणांना याची बाधा झाली असल्याची माहिती आहे.त्यांच्यावर खासगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. यात धर्मापूरी येथील चिंटू महेश रंधये या आठ वर्षीय बालकाचा समावेश असून त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच तावशी, जैतपूर, कोदामेळी या गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त आहे.मागील पंधरा दिवसापासून तापाच्या रुग्णात वाढ होत असून यावर उपाय योजना करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने बारव्हा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर आजारावर प्रतिबंधक उपचार व्हावे म्हणून गावागावात शिबिर लावून उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच गावात नळयोजनेद्वारे दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने आजारात वाढ होत असल्याची माहिती आहे. बारव्हा जैतपूर येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग शेणखताचे ढिगामुळे डासाची उत्पत्ती होत असून दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बारव्हा येथील वॉर्ड क्र. ३ मधील अंगणवाडी समोर जनावरे बांधली जातात आणि आजूबाजूचा परिसर कचऱ्याने वेढलेला आहे. अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांना रस्त्याची सुविधा नसल्याने काडी कचऱ्यापासून मार्गक्रमण करावा लागतो. त्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास त्यांना डेंग्यूची लागण होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीतील पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. वरिष्ठांनी याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी आहे.
जिल्ह्यात ३८ जणांना डेंग्यूची लागण
By admin | Updated: September 6, 2014 23:30 IST