जिल्हा नियोजन समिती सभा : पालकमंत्री राजेंद्र मुुळक यांची माहितीभंडारा : जिल्हा वार्षिक योजना सन २०१३-१४ अंतर्गत मार्च २०१४ अखेर ११४ कोटी ४१ लक्ष रुपये प्राप्त रकमेपैकी ११३ कोटी ३७ लक्ष रुपये खर्च करण्यात आला आहे. खर्चाची टक्केवारी ९९.०९ इतकी आहे. सर्वसाधारण योजना ७० कोटी ९८ लक्ष रुपये, अनुसूचित जाती उपयोजना २९ कोटी ९९ लक्ष रुपये आणि आदिवासी उपयोजना क्षेत्रबाह्य योजनेवर १२ कोटी ४० लक्ष रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य मधुकर किंमतकर, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी, पोलीस अधीक्षक कैलास कणसे, प्रभारी उपआयुक्त (नियोजन) सरीता मुऱ्हेकर उपस्थित होते.जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सर्वांगीन व समतोल विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनांच्या माध्यमातून होणारी विविध विकास कामे लोकाभिमुख झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी मुळक म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना मिळणारा निधी हा निर्धारित वेळेत खर्च झाला पाहिजे. निधी खर्चाबाबत असलेल्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत ते प्रस्ताव अधिकाऱ्यांमार्फत तातडीने पाठवावे. ते त्वरित मंजूर करता येईल. त्यामुळे जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यास मदत होईल. विज वितरण कंपनी दोषपूर्ण मीटरचे सरासरी बील ग्राहकांना देत असल्याची बाब समिती सदस्याने पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर पालकमंत्र्यांनी दोषपूर्ण मीटर वीज वितरण कंपनीने तातडीने लावण्याचे निर्देश उपस्थित वीज वितरण कंपनीच्या अधीक्षकाला दिले.जिल्ह्यातील नगर परिषदेअंतर्गत असलेल्या पर्यटन व तिर्थस्थळाच्या विकासाचे प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवावा. गोसीखुर्द प्रकल्पाच्या राजीव टेकडीवर पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी तसा प्रस्ताव विदर्भ सिंचन विकास मंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. हे दोन्ही पर्यटन व तिर्थस्थळ म्हणून विकसित करावे. यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा असल्यामुळे तलावातील गाळ उपसण्यासाठी पोकलँड व जेसीबी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या डिझेलचा खर्च नाविन्यपूर्ण योजनेतून करणार असल्याचे ते म्हणाले. १५ आॅगस्ट रोजी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने सर्व विषय चर्चेअंती मंजूर करावे, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यातील कोणताही आदिवासी बांधव घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला पालकमंत्र्यांनी यावेळी दिले जिल्ह्यातील जंगलालगतच्या शेतपिकाचे वन्यप्राण्यांमुळे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी सौर कुंपण लावण्याकरीता नाविण्यपूर्ण योजनेतून जास्तीत जास्त निधी देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हा वार्षिक योजना सन २०१४-१५ अंतर्गत जुलै २०१४ अखेर यंत्रणांना २३ कोटी ४५ लक्ष वितरीत करण्यात आले. त्यापैकी १ कोटी २४ लक्ष ७५ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी दिली. यावेळी मागासक्षेत्र अनुदान निधी योजना सन २०१४-१५ च्या आराखड्यास मंजुरी प्रदान करण्यात आली. सभेला निमंत्रित सदस्य माजी आ.आनंदराव वंजारी, जिया पटेल, नलिनी कोरडे, पंढरीनाथ सावरबांधे, विजया शहारे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध यंत्रणांचे विभागप्रमुख उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
विकासावर ११३ कोटी खर्च
By admin | Updated: August 9, 2014 23:32 IST