अंबाजोगाई : कोरोनामुळे सलूनचा व्यवसाय करणाऱ्या नाभिकांची चांगलीच दैना झाली. महामारीने रोजगार हिरावल्यामुळे शेकडो सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला असला, तरी अजूनही काळे ढग नाभिक समाजावर कायम आहेत. काहींना तर हा व्यवसाय बंद करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी इतर कामे करावी लागली. कारण लाॅकडाऊन काळात सलून, हेअर कटिंगची दुकाने बंद होती. ग्राहकांच्या घरीही जाता येत नव्हते. ग्राहकही कोरोनाच्या भीतीमुळे कटिंग, दाढी, मसाज करून घेण्यास घाबरत होते. अनेकांनी घरीच दाढी, कटिंग करणे पसंत केले. याचा नाभिक समाजाला जबर आर्थिक आघात सहन करावा लागला. कोरोना काळात शासनाने अनेकांना मदत केली आहे. परंतु नाभिक समाजाला कवडीचीही मदत शासनाकडून अद्याप मिळाली नाही. यामुळे शासनाने या समाजास आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी समाजातून होत आहे.
....
मुलांच्या शाळांचे शुल्क भरण्यासाठीही पैसे नाहीत
अनेक सलून व्यावसायिकांची मुले खासगी शाळेत शिकतात. परंतु, व्यवसाय बंद असल्यामुळे आवकच राहिली नाही. परिणामी जे काही थोडे थोडके पैसे जमवले, ते कुटुंबाच्या पोषणावरच खर्च झाले. त्यामुळे त्यांच्याकडे पाल्यांच्या शाळेचे शुल्क भरण्याइतपतही पैसे नाहीत. अनेकांनी जसे जमेल तसे पैसे देतो, मुलांचा प्रवेश काढू नका, अशी विनंती शाळा व्यवस्थापनाला केली.
...
७५ टक्के सलून व्यावसायिकांची दुकाने भाड्याने
अंबाजोगाई तालुक्यातील ७५ टक्के सलून व्यावसायिकांची दुकाने ही भाडेतत्त्वावर आहेत. सलून दुकाने बंद असली, तरी भाडे द्यावेच लागले. अनेकांनी त्यांच्याकडे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कमी केले. त्यामुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली. दुकाने बंद असताना भाडे भरण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे अनेक सलून व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत.
....
नाभिक समाज हा किरायाच्या दुकानात आपले काम करून उदरनिर्वाह चालवतो. परंतु कोरोनामुळे दुकाने बंद होती. तरीपण या दुकानाचे भाडे द्यावे लागले. नाभिक समाज हा खूप मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. शासनाने काही तरी मदत करावी.
- मधुकर सुरवसे, तालुकाध्यक्ष, नाभिक समाज, अंबाजोगाई.
....