बीड : एका वृद्धाच्या जुन्या आजाराची माहिती देण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला. याचा मनात राग धरुन बीड शहरातील नोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णाला बाहेर काढल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच नातेवाईकांना अरेरावी करीत धमकावल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून खासगी डॉक्टरांची मुजोरी चव्हाट्यावर आली आहे.
शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन भागातील एका वृद्धाला २६ मार्च रोजी नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सीटीस्कॅनचा स्कोअर चार होता. नोबलला कोरोनाबाधितांवर उपचाराची परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोनाची लक्षणे असल्याने आणि स्कोअर ४ असल्याने रुग्णाला दाखल केले. येथे उपचार करताना या वृद्धाच्या जुन्या आजाराबद्दल नातेवाईकांनी डॉक्टरांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने नातेवाईकांना अरेरावी करण्यात आली. उपचारात हस्तक्षेप केल्याचा आरोप नातेवाईकांवर करण्यात आला. तसेच रुग्णाला बाहेर काढण्यात आले. नातेवाईकांनी इतर डॉक्टरांना विनंती करून दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. सध्या या रुग्णावर बीडमधीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, लॉकडाऊन असतानाही आणि प्रशासनाकडून उपचार करण्याबाबत आदेश असतानाही खासगी रुग्णालयांनी सामान्य रुग्णांना अशाप्रकारे बाहेर हाकलत उपचारास टाळाटाळ केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार असह्य झाल्यानेच रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
कोट
नोबल हॉस्पिटलमधील प्रकाराबाबत तक्रार आली आहे. तक्रारदार आणि डॉक्टर दोघेही भेटले आहेत. याबाबत चौकशी समिती नियुक्ती करीत आहोत. अहवालानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल.
डाॅ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
कोट
रुग्ण दाखल झाला तेव्हा गंभीर होता. आम्ही त्याला स्थिर केले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला हायर सेंटरला नेण्यास सांगितले. परंतु, नातेवाईकांनीच आमच्यासोबत हुज्जत घातली. आम्ही कोणालाही हाकलले नसून उपचारासही टाळाटाळ केलेली नाही. हा सर्व प्रकार जिल्हा शल्य चिकित्सकांना भेटून सांगितला आहे.
डॉ.निलेश गोल्हार, नोबल हॉस्पिटल, बीड