लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. परंतु सध्यातरी जिल्ह्यात अशी परिस्थिती नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात २७१ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. यात शासकीय संस्थेत २४८ तर खाजगीतील ३३ व्हेंटीलेटरचा समावेश आहे. हे सर्व व्हेंटीलेटर सुरु असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे.
जिल्ह्यात शनिवारपर्यंत २६ हजार ७१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पैकी ६५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मागील काही दिवसांपासून तर रोज ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. तसेच नव्या रुग्णांमध्ये गंभीर असलेल्यांची संख्याही वाढत असून ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची मागणीही वाढत आहे. असे असले तरी अद्याप व्हेंटीलेटरबाबत तक्रारी आलेल्या नाहीत. त्या येऊ नयेत, यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
अंबाजोगाईतील तक्रारी वाढल्या
अंबाजाेगाई येथील स्वामी रामानंत तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात ७४ व्हेंटीलेटर आहेत. परंतू यातील बोटावर माेजण्याइतकेच चालू असल्याचे समोर आलेले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार येथे जवळपास २७ व्हेंटीलेटर बंद आहेत. काही व्हेंटीलेटर तर बसविल्यापासून ते सुरुच केले नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातील इतर आरोग्य संस्थांमधीलही अशीच काहीशी अवस्था आहे. पीएम केअर मधून आलेले व्हेंटीलेटर अद्यापही काही ठिकाणी सुरु केले नसल्याचे समजते.
जिल्ह्यात मुबलक व्हेंटीलेटर आहेत. अद्याप कोठेही तुटवडा जाणवलेला नाही. जेव्हा कधी गरज भासेल तेव्हा खाजगी रुग्णालये अधिगृहित केले जातील. रुग्णांनी घाबरुन जाऊ नये, आरोग्य विभाग सतर्क आहे.
-डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक बीड
बीडमध्ये अद्यापतरी तुटवडा नाही
जिल्हा रुग्णालयात ६२ व्हेंटीलेटर आहेत. यातील किती चालू आणि किती बंद याची अधिकृत माहिती मिळत नसली तरी ते सर्व सुरु असल्याचा दावा होत आहे.
दरम्यान, या व्हेंटीलेटरबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आयसीयूमध्ये कर्तव्य बजावणाऱ्यांना त्याबद्दल माहितीच नाही.
सध्या कोरोनासाठी स्वतंत्र पदभरती करण्यात आलेली आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक हे नवीन आहेत. त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे.