अध्यक्षपदासाठी सर्वच पक्षांची फिल्डिंगजितेंद्र दखणे अमरावतीजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हापरिषदेतील सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र, सत्तेसाठी लागणारे संख्याबळ जुळविताना सर्वच पक्षांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीच्या सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्या ५९ एवढी आहे. यात काँग्रेस २५, राष्ट्रवादी ७, शिवसेना ७, भाजप ९, विदर्भ जनसंग्राम २, बसप २, प्रहार ५ व रिपाइं आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापनेसाठी ३१ सदस्य संख्येची गरज आहे. शिवसेना, भाजप, प्रहार, बसप, जनसंग्राम यांना सोबतीला घेऊन राष्ट्रवादीने अध्यक्षपद काबीज केले होते. जिल्हा परिषदेत सर्वाधिक २५ संख्याबळ असलेल्या काँग्रेसला बाजूला सारुन राष्ट्रवादीने भाजप, शिवसेना, प्रहार, बसपा, अपक्ष यांच्या मदतीने सत्ता मिळविली. विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. अध्यक्षपदाची संधी यावेळी हातून जाऊ नये, म्हणून काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. मात्र, ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या सात सदस्यांची मदत घ्यायची काय? याबाबत काँग्रेसमध्ये मंथन सुरु आहे. दुसऱ्या पक्षाची मदत घ्यायची किंवा नाही, यावरही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चिंतन सुरु असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत सध्या दुफळी माजली आहे. सात सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीचे तीन सदस्य संजय खोडके समर्थक मानले जातात. त्यामुळे खोडके समर्थक सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजपने प्रहार, जनसंग्राम, बसप, रिपाइं व अपक्षांंच्या मदतीने जिल्हा परिषदेत सत्ता बळकाविण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेत शिवसेने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करुन सत्ता मिळविली होती. त्यावेळी राकाँचे रमेश वडतकर यांना अध्यक्षपद तर शिवसेनेचे बाळासाहेब भागवत यांना उपाध्यक्षपद देण्यात आले होते. जिल्हा परिषदेचा पूर्वेतिहास पाहता शिवसेना-भाजप अशी खेळी खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणूक : राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार
By admin | Updated: September 16, 2014 00:35 IST