संजय खासबागे वरूडवरूड तालुक्यात साथीच्या आजाराने कहर केला आहे. शेकडो रुग्ण मलेरीया, टायफाईडने फणफणत आहे. ग्रामीण रुग्णालयातील बाहयरुग्ण विभागात साडेपाचशे ते ६०० रुग्णांची दरदिवसाला नोंद होत आहे. खासगी दवाखानेही रुग्णांच्या गर्दीने हाउसफुल्ल आहेत. ग्रामीण भागातील अस्वच्छतेमुळे पुन्हा तापाने डोके वर काढले आहे. तालुक्यात डांस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.वायुजन्य आणि जलजन्य आजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. यामध्ये मलेरिया , टायफाईडच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तापासह खोकला, सर्दीने नागरीक फणफणत आहे. सरकारी दवाखान्यासह खासगी रुग्णालयात सुध्दा गदीर् वाढली असून ग्रामीण रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात दरदिवसाला साडेपाचशे ते ६०० रुग्णांच्या नोंंदी होत आहे. लोणी, पुसला, राजुराबाजार, शेंदूरजनाघाट, आमनेर येथे सुध्दा बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी आहे. सरकारी दवाखान्यासोबतच खासगी रुग्णालयातही रुग्णांची तोबा गर्दी आहे. दरवर्षी येणारी विषाणूजन्य तापाची जिवघेणी साथ यंदा नसली तरी मलेरीया आणि टायफाईडने कहर केला आहे. आरोग्य विभागाने वेळोवेळी जनजागृती करुन ग्रामपंचायत, नगरपरिषदांना डांस प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या. मात्र, अद्यापही पाहिजे तशी ठोस पाउले उचलण्यात आली नाही. स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. कागदावर घेण्यापुरतीच धूरफवारणी करण्यात येत असून स्वच्छतेच्या नावावर हजारो रुपये खर्च दाखविल्या जातो. मात्र तुंबलेल्या नाल्या, गांजरगवत, शेण,खताचे उकीरडे जैसे थे आहे. ग्रामीण भागातही घाणीचे साम्राज्य कायम आहे. डेंग्यू सदृष्य तापाने सुध्दा अनेक जण फणफणत असून याकडे आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. राजकिय नेत्यांचे लक्ष विधानसभेवर असल्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार तरी कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरुड तालुक्यात साथीचा कहर
By admin | Updated: September 13, 2014 00:56 IST