ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली. परंतु त्यांच्याकडे सिंचनाचे साधन उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसमोर उगवलेले सोयाबीनचे पीक वाचविणे कठीण झाले आहे. सोयाबीन पाठोपाठ कापूस, तूर, धान, ज्वार व मका पिकांची अशीच परिस्थिती झालेली आहे. साधारणत: मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून समाधान पावसाला सुरुवात होते आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण पेरणी झालेली असते. मात्र, यंदा खरीप हंगामात जून महिन्याच्या दोन-तीन दिवस पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अवघ्या दोन दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास नुकतेच जमिनीबाहेर आलेल्या कोंबांसह बाळपीक जळून नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. येथील शेतकऱ्यांनी कसेबसे कर्ज घेऊन पिकाची पेरणी केली आहे. मात्र, उगवलेल्या पिकांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आजमितीस ८० टक्के शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी आटोपली आहे. मात्र, पावसाने दडी दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहे. कसेबसे पेरणी केल्याने महागडे बियाणे पुन्हा खरेदी करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस न पडल्यास दोन दिवसात शेतकऱ्यांना पिकावर नागर फिरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मेळघाटात पावसासाठी कुठे अखंड रामायण कुठे सुंदर कांड, गावोगावी मारुतीला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST