नियम धाब्यावर : वर्दळीच्या रस्त्यावरच उभे राहते वाहनप्रसन्न दुचक्के - अमरावतीशहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी सांभाळणारेच जर वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतील तर नागरिकांनी बघायचे कोणाकडे? हा प्रश्न शुक्रवारी ‘लोकमत’ने पुन्हा वाहतुकीबाबत शहराचा फेरफटका मारला असता स्पष्ट झाले. शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत पोलीस उपायुक्त बी.के.गावराने झोन-२ यांच्यावर वाहतूक शाखा पूर्व व पश्चिम विभागाची जबाबदारी आहे. परंतु त्यांच्याकडूनच सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन होताना दिसते. त्यांचे शासकीय वाहन त्याच्या बंगल्यासमोर वर्दळीच्या वळण रस्त्यावर उभे राहत असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ३४ मिनिटे शासकीय वाहनाचे अवैध पार्किंगमालटेकडीनजीकच्या पोलीस पेट्रोल पंपसमोर वळण रस्त्यावर गावराने यांचा बंगला आहे. बसस्थानक व पोलीस आयुक्त कार्यालयाकडून येणारी अनेक जड वाहने या वळण रस्त्यावरुन पंचवटी मार्गाने धावतात. याच मार्गावर वळण रस्त्यावर पोलीस उपायुक्त बी.के. गावराने यांचा शासकीय बंगला आहे. त्यांना घेण्यासाठी दररोज शासकीय वाहन येते. हे वाहन बंगल्यासमोर रस्त्यावरच थांबते. शुक्रवारी 'लोकमत'ने केलेल्या स्टिंगदरम्यान शुक्रवारी सकाळी ९.३५ वाजता गावराने यांना घेण्यासाठी वाहन आले. वाहनात एक सुरक्षा रक्षक होता. चालकाने वाहन थेट बंगल्यासमोर वळण रस्त्यावर उभे केले. तब्बल ३४ मिनिटे गावराणे यांचे वाहन रस्त्यावर उभे होते. सकाळी १०.९ मिनिटांनी पोलीस उपायुक्त गावराने बंगल्याच्या बाहेर आले. आणि वाहनात बसून निघून गेले. हा संपूर्ण घटनाक्रम ‘लोकमत'ने कॅमेऱ्यात कैद केला.
भररस्त्यात उपायुक्तांचे वाहन
By admin | Updated: August 9, 2014 23:28 IST