१९६२ मध्ये रा.सू. गवई आणि त्यांचे राजकीय गुरू दादासाहेब गायकवाड हे लोकसभेची निवडणूक हरले असले तरी रा.सू.गवई यांनी विधानसभेवर २२ आमदार निवडून आणले होते. त्या आमदारांचे नेते रामदयाल गुप्ता यांनी रा.सू.यांच्याकडे निवडणुकीला उभे रहाण्याचा आग्रह धरला. परंतु हा अधिकार दादासाहेब गायकवाड यांचा आहे, असे गवई यांनी स्पष्ट केले. रामदास गुप्तांनी गवर्इंचं म्हणणं ऐकलं. दादासाहेब गायकवाडांची गवई यांनी भेट घेतली. त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीला उभं राहावं असा आग्रह धरला. या पोराचं ऐकू नका, हा तुम्हाला तोंडघशी पाडेल, असा सल्ला इतर पुढाऱ्यांनी गायकवाडांना दिला. रा. सू. गवर्इंनी त्यांना सांगितले. दादासाहेब आपण निवडणुकीला उभे रहा. आपण निवडून याल यात्री मला खात्री वाटते. त्यावेळी मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. त्यांचे उमेदवार होते बी.सी. कांबळे. रिपब्लिकन पक्षात पहिली फूट पडली होती ५८ साली. तेव्हापासून बी.सी. कांबळे आणि आवळे बाबू हे दादासाहेब गायकवाड यांच्या विरोधात होते. याची यशवंतरावांना कल्पना होतीच. त्यांनी बी.सी. कांबळेंना राज्य सभेकरिता उभं केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दादासाहेब गायकवाडांचा पुढाकार होता. गवर्इंनीही या लढ्यात स्वत:ला झोकून दिल. तरी देखील संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वत:चा वेगळा उमेदवार उभा केला. असे हे दोन उमेदवार उभे असताना आपण निवडून येणार नाहीच हे दादासाहेब गायकवाडांनी ओळखलं. पण तरीही आपल्या शिष्याला गवर्इंना त्यांना नकार देता आला नाही. गवई यांनी निवडणुकीची व्यूहरचना सुरु केली. राहांदळे हे पी.एस.पी.चे नेते होते. ते होते विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यातले. उत्तम संसदपटू तर होतेच. इंग्रजी व मराठी भाषेवर त्याचं प्रभूत्व होतं. अनेक वेळा ते विधानसभा गाजवायचे. त्यांचे १४ ते १५ आमदार होते तर गवई यांच्याकडे २२ आमदार होते. राहांदळे अणि आपण एकत्र आलो तर आपले उमेदवार विधान परिषदेत निश्चित निवडून येतील, हे गवई यांचं समिकरण. राहांदळेंना पण गायकवाडांबद्दल अतिशय आदर होता. गवई राहांदळेंना म्हणाले, दादासाहेब गायकवाडांना चार पाच मतांची आवश्यकता आहे. राहांदळे म्हणाले, आम्ही मदत केली तरी चार-पाच मतं कमी पडतील. गवर्इंना सांगितलं. मी चार-पाच मतांची बाहेरुन व्यवस्था केली आहे. आपण निश्चिंत असा. राहांदळे व गवई दोघांचा करार निश्चित झाला. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा गवर्इंनी एवढा अभ्यास केला होता की, ते या पद्धतीचे एक्सपर्ट बनले होते. निवडणुकीपूर्वी दोन दिवस अगोदर दादासाहेब गायकवाड मुंबईला होते. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. गायकवाडांना वाटत होतं आपण निवडून येणार नाही. दादासाहेब गायकवाड आणि रा. सु. गवई हे खंडेलवाल या आमदारांच्या खोलीत मुक्कामी होते. दादासाहेब गायकवाड यांच्या निवडणुकीचा एजंट म्हणून गवई विधानभवनात गेले. गायकवाडांनी गवर्इंच्या नावाने खंडेलवाल यांच्या खोलीत टेबलावर पत्र लिहून ठेवलं. ''भाऊसाहेब, मी पंजाब मेलनी दिल्लीला जात आहे. यदा कदाचित माझा पराभव झाला तर सामान आणलेले बरे.''गायकवाड त्यावेळी ६० वर्षांचे तर गवई होते ३० वर्षांचे. ते गवर्इंना नेहमी भाऊसाहेब म्हणायचे. इकडे दादासाहेब गायकवाड पंजाब मेलने व्ही.टी.वरून रवाना झाले. तिकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. पहिल्याच फेरीत दादासाहेबांना ३६ मते मिळाली. त्यावेळी बी.सी. कांबळेंना १० मते पण नव्हती. सेकंड प्रिफरन्स सुरू झालं. गवर्इंनी सेकंड प्रिफरन्समध्ये १०-१२ जण जुळवून ठेवले होते. सेकंड प्रिफरन्सला बी.सी. कांबळे जोरात वर यायला लागले. दादासाहेब गायकवाड हळूहळू प्लस होत होते. एक अशी विशिष्ट वेळ आली त्यावेळी कोशन हवा असतो. तिथपर्यंत गायकवाड पोहोचले. दादासाहेबांचे सिलेक्शन एजंट असलेल्या गवर्इंनी विधीमंडळाचे सचिव बेलवडी व खराबे यांना निवडणुकीची प्रक्रिया बंद करण्याची सूचना केली. दादासाहेब गायकवाडांनी कोशन पूर्ण केलं आहे. त्यांना विजयी घोषित करा, अशी मागणी केली. पुढची फेरी झाली असली तर बी.सी. कांबळे निवडून आले असते, याची गवर्इंना कल्पना आली होती. बेलवडी आणि खराबे उद्धटपणे गवर्इंना म्हणाले, तुम्हाला अप्रत्यक्ष निवडणुकीची माहिती आहे का? गवई म्हणाले, पूर्णपणे आहे. मी चर्चेला तयार आहे. आता बेलवडी आणि खराबे यांची पंचाईत झाली. कारण बी.सी. कांबळे हे यशवंतराव चव्हाणांचे उमेदवार. दोघे बाहेर गेले. गवई बसून होते. बेलवडी आणि खबारे यशवंतरावांना परिस्थितीची कल्पना देणार हे गवर्इंना माहीत होतं. बेलवाडी व खराबे मुख्यमंत्री यशवंतरावांना परिस्थितीची कल्पना देणार हे गवर्इंना माहीत होतं. बेलवडी व खराबे यशवंतरावांच्या केबीनमधून बाहेर येताच गवई आत गेले. यशवंतरावांना परिस्थिती समजावून सांगितली. यशवंतराव म्हणाले, नियमाप्रमाणे होईल. गवई परत चेंबरमध्ये आले. दहा मिनिटे दोन्ही सेक्रेटरींशी युक्तीवाद केला. ही गवर्इंची आणि यशवंतरावांची पहिलीच भेट! पण गवई यांच्यासंबंधीची सर्व माहिती त्यांना इंटेलिजन्स ब्युरोतर्फे आधीच समजली होती. त्यांनी सेक्रटरींना निरोप पाठविला. भानगडी करु नका, गवई सेक्रेटरींचे हावभाव बघत होते. कोण काय करीत आहे याची त्यांना कल्पना येत होती. शेवटी अधिकाऱ्यांनी गायकवाड निवडून आलेत हे जाहीर केलं. आपल्या गुरुला ही अत्यानंदाची बातमी सांगायला गवई फुलांचा गुच्छ व पेढे घेऊन सहकाऱ्यांसोबत आमदार निवासात गेलेत; पण गायकवाडांऐवजी तेथे त्यांचं पत्र होतं. चौकशी केली तर समजलं पंजाब मेल सुटली आहे. गवई लगेच जी.पी.ओ. मध्ये गेलेत. टेलिग्राम केला. ''दादासाहेब उपाख्य बी.के. गायकवाड- द्वारा स्टेशन मास्तर. आपण निवडून आलात आपले अभिनंदन.''पंजाब मेल भुसावळ स्टेशनवर पोहोचली. स्टेशन मास्तरने दादासाहेबांच्या बोगीचा दरवाजा ठोठावला. दादासाहेब गायकवाडांच्या हातात टेलिग्राम ठेवला. मजकूर वाचल्यानंतर दादासाहेब भुसावळला सामान घेऊन उतरले. मुंबईला पोहोचले. वर्तमान पत्रात त्यांच्या विजयाची बातमी झळकत होती. आता संशयाला जागाच नव्हती. ते आमदार निवासात पोहोचले तेव्हा गवई झोपले होते. त्यांनी गवर्इंना उठवलं. त्यांची पाठ थोपटली म्हणाले, हा आपला पराक्रम आहे. आपल्या पराक्रमाचा मला अंदाज आला नाही. आपणास कष्ट झाले माफ करा. गवर्इंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. गुरुंना दिलेली ती अनोखी भेट होती. (कृतार्थ जीवन श्री रा.सू. गवई व्यक्ती आणि कार्य या ग्रंथावरून साभार)
गुरुंना दिलेली अनोखी भेट
By admin | Updated: July 26, 2015 00:39 IST