अमरावती : उन्हाळ्याच्या सुट्यांचे सत्र संपताच २६ जूनपासून सुरू होणार्या नवीन सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची तयारी प्रशासनाने चालविली आहे. यासाठी कोलकाता येथे गणवेशाचे शिवणकाम सुरू असल्याची माहिती आहे. ६१ प्राथमिक तर ५ माध्यमिक शाळांतील १२ हजार विद्यार्थ्यांना एकाच दिवशी गणवेश वाटप करण्याच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाईल. त्याकरिता महापालिका निधीतून एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी गणवेश वाटपात अनियमितता होती. मात्र शालेय विद्यार्थ्यांना वेळेतच गणवेश मिळावा, यासाठी आयुक्त अरूण डोंगरे यांनी विशेष लक्ष घालून कंत्राट प्रक्रिया राबविली. या महिन्याच्या शेवटी महापालिकेच्या भांडार विभागात गणवेश ‘ओके’ होऊन परत आणले जातील, अशी माहिती आहे. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
पहिल्या ठोक्याला विद्यार्थ्यांना गणवेश
By admin | Updated: May 10, 2014 23:56 IST