नव्यांचे आदेश नाहीत : अधिकाऱ्यांची प्रतीक्षाअमरावती : शहर आयुक्तालयातील तीनही पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश असल्याने पोलीस विभागात आश्चर्य व्यक्त होत आहे. एकाच वेळी तीनही आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या जागी कोण? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. शहर पोलीस उपायुक्त (परिमंडळ) सोमनाथ घार्गे यांची बदली मरोळ मुंबई येथील पोलीस प्रशिक्षण विद्यालयाच्या प्राचार्यपदी करण्यात आली आहे. याशिवाय चार महिन्यांपूर्वी रूजू झालेले उपायुक्त (मुख्यालय) मोरेश्वर आत्राम यांची बदली औरंगाबाद पीसीआरच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली तर वाहतूक विभागाची धुरा सांभाळणारे उपायुक्त नितीन पवार यांची बदली नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. गृह विभागाने ११ मे रोजी आदेश काढून राज्यातील पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त संवर्गातील ३४ अधिकाऱ्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब केले. मागील अनेक वर्षांपासून शहर आयुक्तालयाला तीनही पोलीस उपायुक्त मिळाले होते. त्यामुळे पोलीस विभागात सुसूत्रता आली होती. घार्गेंचा अमरावतीमधील कार्यकाळ संपुष्टात येत असला तरी मोरेश्वर आत्राम आणि नितीन पवार यांना अमरावती शहर आयुक्तालयात येऊन उणेपुरे ६ महिनेही झालेले नाहीत. त्यामुळे उभय उपायुक्तांच्या बदल्या प्रशासकीय की विनंती स्वरूपाच्या हे स्पष्ट होऊ शकले नाही. तीनही पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश निघाले असताना नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांची नामनिश्चिती मात्र अद्यापही करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
एकाच वेळी तिन्ही डीसीपींचे स्थानांतरण
By admin | Updated: May 13, 2016 00:10 IST