पाच रुपयांसाठी जीव धोक्यात : एसटी महामंडळाची हेतुपुरस्सर डोळेझाकअमरावती : येथील मध्यवर्ती बसस्थानकातून दरदिवसाला दोनशेच्या वर प्रवाशांची चोरी होत आहे. बसस्थानक परिसरात खासगी वाहने उभी करुन त्यांचे एजंट बसस्थानकात शिरतात व प्रवासी पळवून नेतात. केवळ पाच रुपयांच्या तिकीट दराच्या फरकाने प्रवासी जीव धोक्यात घालत असल्याचे उघड झाले आहे. यातून एसटी महामंडळाला दरदिवसाला लाखोंचा फटका बसत असून एसटी महामंडळ मात्र याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते.अमरावती बसस्थानकातून दरदिवसाला ७० बसेस धावतात. त्यांच्या ३२० फेऱ्या होतात. तर बाहेरच्या बसस्थानकातून येणाऱ्या बसेसच्या ९९० फेऱ्या होतात.खासगी वाहतुकीचे आक्रमणएवढ्या मोठ्या प्रमाणात अमरावती बसस्थानकातून प्रवाशांची वर्दळ राहते. याचाच फायदा खासगी वाहतूकदारांनी घेणे सुरु केले आहे.बसस्थानकाबाहेर लक्झरी बसेस, मारुती व्हॅन, क्रुझर, टाटा एस ही वाहने प्रवाशी चोरुन नेण्यासाठी उभी केलेली असतात. त्यांचे एजंट बसस्थानकात येऊन प्रवासी शोधतात. प्रवाशाला कोणत्याही गावाला जायचे असेल तर त्या गावची एसटी लागायला वेळ आहे, आताच निघून गेली, गर्दी खुप आहे, असे विविध कारणे एजंटांकडून प्रवाशांना सांगितले जातात. तसेच एसटी पेक्षा आपल्या वाहनाचा प्रवास दर कमी असल्याचे सांगून आपले सावज टिपतात. दिवसभरात सुमारे २५ पेक्षा जास्त एजंट बसस्थानकात फिरुन प्रवाशांची चोरी करीत आहेत. हा प्रकार सर्रास सुरु असून एसटी महामंडळ मात्र याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करताना दिसत आहे. यासह मध्यप्रदेश परिवहनच्या बसेस अमरावतीतून जाण्यापूर्वी केवळ १५ मिनिट पूर्वी अमरावती बसस्थानकात प्रवेश देण्याचा नियम आहे. मात्र दुपारी २ वाजता बसस्थानकात प्रवेशास मूभा असणारी मध्य प्रदेश परिवहन विभागाची छिंदवाडा जाणारी बस रविवारी दुपारी १ वाजता बसस्थानकात दाखल झाली होती.
बसस्थानकातून प्रवाशांची चोरी
By admin | Updated: August 10, 2014 22:43 IST