चिखलदरा : येथील आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या एकलव्य रेसिडेंशियल स्कूलच्या परीविक्षाधीन सात शिक्षकांनी शासनाने करारनाम्यानुसार मागण्या मंजूर न केल्याने शनिवापासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यामुळे आदिवासी विभागात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचे हिीत लक्षात घेता सेवाकर्तव्यावर हजर राहून संतोष दुकळे, धनश्री दर्णे, अरूण मस्कर, सुजाता आजुर्ने, राजेश सोनकांबळे, विलास केंदळे व गजानन किनकर हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यातील दोन संतोष मधुकर डुकरे व सुजाता आजुर्ने यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखले केले आहे.२०१० मध्ये एकत्रित मानधनावर परीविक्षाधीन कर्मचारी म्हणून आदिवासी विभागाने कर्मचाऱ्यांची भरती केली. तीन वर्षांतील कामाचे मूल्यमापन करून त्यांना सेवेत काम करण्याचे आदेशात नमूद केले. त्यानुसार उपरोक्त शिक्षकांनी आपल्या सेवेचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. शासनाला याची आठवण होेण्यासाठी निवेदन देण्यात आले. परंतु आदिवासी विभागाने त्यावर दुर्लक्ष केले. उलट एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नेमणूक मानधन तत्त्वावर करण्यात आली आहे त्यांचा परीविक्षाधीन कालावधी विपोलीत करण्यात येणार नसून यापुढेही मानधन देण्याचा नवीन आदेश काढण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांचे शाळेतच उपोषण सुरू
By admin | Updated: August 10, 2014 22:45 IST