बडनेरा : बहुचर्चित नितीन हिंगासपुरे हत्या प्रकरणातील तीन आरोपींची पोलीस कोठडी १४ मे पर्यंत वाढवून मिळाली आहे. या प्रकरणातील आरोपी मेघाचा मामा सूरज गुल्हाने याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्थानिक
नंदनवन कॉलनी येथील नितीन हिंगासपुरे याची हत्या करुन त्याचा मृतदेह कोंडेश्वर मार्गावरील जंगलात फेकून दिला होता. याप्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना अल्पावधीत यश मिळाले. पोलिसांनी याप्रकरणी नितीनची चुलत वहिनी मेघा हिला अटक केल्यानंतर तिने पोलिसांना हकीकत सांगितली. तिने पोलिसांना दिलेल्या बयाणानुसार, नितीन ब्लॅकमेल करीत असल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी कारंजा लाड येथील मामा सूरज गुल्हानेला सांगितले. मामाच्या मदतीने सुपारी किलर समीर उर्फ अब्दुल गनी, आनंद गायकवाड व गजानन भोंगळे या तिघांना ४३ हजार रुपये दिले. ठरल्यानुसार नितीनला चुलत वहिनी मेघाने घरी बोलाविले व त्याचा गेम केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून मृतदेह कोंडेश्वर परिसरातील जंगलात फेकून देण्यात आला. याप्रकरणी
पोलिसांनी मेघासह पाच आरोपींना अटक केली. त्यातील समीर ऊर्फ अब्दुल गनी, आनंद गायकवाड, गजानन भोंगळे व सूरज गुल्हाने या चौघांना १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी पोलीस कोठडी संपुष्टात आल्याने चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सूरजला न्यायालयीन तर उर्वरीत तीन आरोपींना १४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी मृत नितीनची वहिनी मेघा हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.