अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या तसेच साठवणूक करणाऱ्यांकडून धमक्या देण्यात आल्याप्रकरणी प्रशासनाला दिलेल्या तक्रारीवरून कुठलीही कारवाई झाली नसल्याने राहुल सोमेश्वर गुल्हाने नामक इसमाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी तैनात पोलिसांच्या समयसूचकतेमुळे पुढील अनर्थ टळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अवैध वाळू उपसा, वाहतूक व साठवणुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणात घोंघावत आहे. यासंदर्भात तलाठी यांच्यामार्फत कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा व हस्तक्षेप करुन धमक्या देणाऱ्या लोकप्रतिनिधींसह दोषींविरुद्ध फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राहुल सोमेश्वर गुल्हाने यांनी नांदगाव तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयात दिले होते. निवेदन देऊन सात दिवसांच्या आत यावर कारवाईची मागणी गुल्हाने यांनी प्रशासनाकडे केली होती. अन्यथा या विरोधात आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. मात्र प्रशासनाने वारंवार निवेदने देऊनही या संदर्भातील कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी १२ वाजताच्या सुमारास राहुल सोमेश्वर गुल्हाने यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामुने यांच्या दालनालगतच्या परिसरात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी राहुल गुल्हाने याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील रॉकेलची बॉटल व आगपेटी जप्त केली. गुल्हाने यांना गाडगेनगर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Updated: September 17, 2014 23:29 IST