अमरावती : लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सुविधेकरिता एसटी महामंडळाची बस सेवा सुरू आहे. पूर्वी आठशेपेक्षा जास्त बसफेऱ्या व्हायच्या. आता मात्र फक्त चार ते पाच बस फेऱ्या होत असून, प्रवाशांकडून तीच ती कारणे दिली जात आहेत. कुणाला कोविडमुळे नातेवाईक दगावला असेल, तर अंत्यसंस्काराला जायचे आहे, तर कुणाला नातेवाइकांची प्रकृती चांगली नसल्यामुळे भेटायला जायचे आहे, तर कुणाला पूर्वीच नातेवाइकांचे लग्न जुळले आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये लग्नाकरिता प्रवास करायचे आहे, ही कारणे प्रवाशांनी सांगितली. बसमध्ये बसल्यानंतर चालक-वाहकही प्रवाशांना तुम्ही प्रवास कशासाठी करीत आहेत, याची विचारणा करीत आहेत. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सॅनिटायझर हातावर देत आहेत. अमरावती मध्यवर्ती आगारातून नागपूर, परतवाडा, वरूड या महत्त्वाच्या मार्गांवर चार ते पाच बसफेऱ्या रोज सोडण्यात येत आहे, तर इतर आगाराच्या नागपूर, अकोला व यवतमाळ येथून काही बस फेऱ्या अमरावतीला येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.
१) जिल्ह्यातील एकूण आगार - ८
२) बसेस चालविल्या जातात - ४
३) रविवारी १७५ प्रवास करणाऱ्यांची संख्या
बॉक्स:
एसटी कर्मचाऱ्यांसोबत वाद
एसटी महामंडळाने फक्त आवश्यक सुविधेकरिता प्रवाशांना परवानगी दिली आहे. मात्र, काही वेळेच इतर प्रवासीसुद्धा प्रवास करीत असताना वाहकाच्या लक्षात येताच तो त्यांना हटकत आहे. त्यामुळे काही नागरिकांना अंत्यसंस्कारला तर कुणाला लग्नाला, तर कुणाला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जायचे असते. त्यामुळे असे प्रवासी थेट वाहकाशी वादसुद्धा घालत आहेत. मात्र, अशा घटना बोटावर मोजण्याइतपतच आहेत.
कोट
सध्या प्रवाशीच नाही. त्यामुळे बसफेऱ्या कमी केल्या असून, रोज फक्त चार ते पाच बस फेऱ्या महत्त्वाच्या मार्गावर सोडण्यात येत आहे. रविवारी प्रवासी संख्या १७५ एवढी होती. त्यातून फक्त अडीच हजाराचे उत्पन्न मिळाले. इतर दिवशीही हीच परिस्थिती आहे.
श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक अमरावती
बॉक्स:
या मार्गावर बस फेऱ्या
अमरावती जिल्ह्यात आठ आगार, तर १४ बसस्थानक आहेत. मात्र फक्त अमरावती मध्यवर्ती आगारातून अत्यावश्यक सुविधेकरिता बसेस सोडल्या जात आहेत. यामध्ये एक नागपूर, एक वरूड तर दोन परतवाडासाठी बस सोडण्यात येत आहेत. या मार्गावर फारशी गर्दीसुद्धा नाही. शनिवारी प्रवास करणाऱ्यांची संख्या फक्त ८० होती.
बॉक्स : तीच ती कारणे
१) कोविडमुळे नातेवाइकांचा मृत्यू झाल्यामुळे अंत्यसंस्काराला किंवा नातेवाइकाच्या भेटीला,
२) लॉकडाऊनपूर्वी नातेवाइकांची लग्न जुळले असेल तर लग्नसमारंभाकरिता
३) अपघात झाला आहे, रुग्ण भरती आहे किंवा इतर आजारामुळे नातेवाइक दवाखान्यात उपचार घेत आहे. त्यांना भेटण्याकरिता असे कारणे दिली जात आहेत.