बाजार फुलला : गोवर्धन पूजनासाठी पशुपालकांनी केली खरेदीमोर्शी : येथे दिवाळीपूर्वी आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात मोरपंखांची विक्री करण्यात आली. गोवर्धन पूजन, घरात भींतीवर पाल येऊ नये या उद्देशाने मोरपंखांची विक्री झाली. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर भरलेल्या आठवडी बाजारात अनेकांच्या हातात मोरपंख दिसून आले. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या गोवर्धन पूजनाप्रसंगी बकऱ्या, गाई वासरांना सजविण्याकरिता या मोरपंखांचा उपयोग केला जातो. पोळ्याप्रसंगी घरात जपून ठेवलेल्या या मोरपंखांचा उपयोग बैलांनाही सजविण्याकरिता व बेगड सजविण्यासाठी केला जातो. काही नागरिक घरात भिंतीवर पालीचा संचार होऊ नये म्हणूनही घराच्या आतील भिंतीवर मोरपंख लावून ठेवतात. अर्थात मोरपंख लावल्याने पाल येत नाही. यासंदर्भात कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. तथापि सामान्य नागरिकांची तशी भावना आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे बकऱ्या, गाय वासरू आहेत, अशा लोकांसोबतच सामान्य नागरिकसुध्दा मोठ्या प्रमाणात मोरपंख विकत घेतात. वरुड येथील पुंडलिकराव बोराडे यांनी ४० रुपये डझनाप्रमाणे मोरपंख विकले आहे. त्यांच्याशी संपर्क केला आग्रा येथून या दिवसांत मोरपंख विकण्याकरिता येथे व्यापारी येथे येतात. त्यांच्याकडून ते दरवर्षी मोरपंख खरेदी करतात आणि विकतात, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मोर्शीचे सचिन पेदे हेसुध्दा मोरपंख विक्रेता आहेत. ते अमरावती येथून मोरपंख ठोक भावात खरेदी करून विकत असल्याचे त्यांनी सांगितले. मोरपंख इंदोर, पांढुर्णा, भोपाळ, नागपूर येथून अमरावतीच्या व्यापाऱ्याला पुरविले जात असल्याचे पेदे यांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)उत्तरेकडील राज्यातून येतात मोरपंख !राजस्थान येथे सर्वाधिक मोर आढळतात. पूर्वी मोरपंख विकले जात नसे. त्यामुळे कोणी त्याला महत्त्व देत नसे. तथापि आता मोरपंख विकली जात असल्यामुळे राजस्थानातील शेतकरी, शेतमजूर मोरपंख गोळा करून ते विकतात, अशी माहिती येथील गिरधर मंत्री यांनी दिली. शिवाय वनक्षेत्रालगत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातूनही मोरपंख गोळा करून विकली जात असल्याची माहिती आहे. मोर्शी परिरातील भांबोरा, नळा माणी इत्यादी वन क्षेत्राला लागून असलेल्या जंगलातही मोठ्या प्रमाणात मोर असल्याचे बोलले जात आहे. या परिसरातील गुराखी, शेतमजूर मोरपंख गोळा करून विकतात. मोरपंख बारमाही झडतातदरवर्षी बाजारात येणारे मोरपंख हे या राष्ट्रीय पक्ष्यांच्या कत्तलीतून तर प्राप्त केले जात नाही ना, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे. परंतु हे साफ चुकीची असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मोराच्या शरीरातून बारमाही मोरपंख गळून पडतात. विशेषत: पावसाळयात मोर पिसारा पसरवून नृत्य करतात. त्यावेळी मोरपंख गळतात, असेही बोलले जात आहे. बारा महिने मोरपंख गोळा करुन ते विक्रीला उपलब्ध केल्या जातात असेही बोलल्या जाते.
मोर्शीच्या बाजारात मोरपंखांची विक्री
By admin | Updated: November 15, 2015 00:12 IST