अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असणाऱ्या नर्सिंग वसतिगृहामधील ९० महिला प्रशिणार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या वसतिगृहात वॉर्डन पदाला मान्यता असूनही अनेक वर्षांपासून येथे पद भरती केली गेली नाही. त्यामुळे वसतिगृहातील प्रशिक्षणार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासन स्तरावर महिलांच्या सुरक्षेसंबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसंबधित उपाय योजनेचा बोजवाजा वाजल्याचे दिसून येत आहे. महिला अत्याचाराच्या दरदिवसाला घडत आहेत. शहराच्या मध्यवस्तीमधील नर्सिंग वसतिगृहाची सुरक्षा सद्यस्थितीत वाऱ्यावर आहे. तेथील प्रवेश द्वारावर सुरक्षेचा अभाव असल्याने वसतीगृहात कोणीही प्रवेश करु शकतो, अशी स्थिती आहे. तसेच वसतिगृहात वार्डन नसल्यामुळे वार्डनचा कार्यभार तेथील गृहपाल व वस्त्रपालाकडे देण्यात आला आहे. सेवेवर असणाऱ्या गृहपालसुध्दा तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार आहेत. या वसतिगृहात ९० महिला प्रशिक्षणार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या जेवणाची व निवासाची सुविधा शासनामार्फत करण्यात आली आहे. प्रवेश द्वारावरील सुरक्षेकरिता तीन वॉचमॅन नियुक्त करण्यात आले आहेत.
नर्सिंग वसतिगृहातील ९० प्रशिक्षणार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Updated: July 15, 2014 23:53 IST