अमरावती : मर रोगाने हानी झालेल्या जिल्ह्यातील १५ केळी उत्पादकांना रोपे विकणाऱ्या कंपनीने ४३ लाख १९ हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. सन २०१३ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील ‘कोरे बायोटेक’ कंपनी द्वारा उतीसंवर्धन केळीची रोपे शेतकऱ्यांनी विकत घेतली होती. कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली लागवड केली. मात्र, काही दिवसांत ‘मर’ रोगाने ४० टक्क्यावर रोपे सुकली. तरीही कंपनीद्वारे नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद व कागदपत्रांची शहानिशा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४३ लाख १९ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. उतीसंवर्धक केळीची रोपे सुकत असताना कंपनीद्वारे शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आले नाही. परिणामी फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यावर तत्कालीन तालुका कृषी अधिकारी दिलीप लाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. कृषी अनुसंधान केंद्राचे कृषी विषयतज्ज्ञ पी.एच.महल्ले, के.पी.सिंग, व्ही. डी.खवली, महाबीजचे अधिकारी सलामे, कृषी अधिकारी रावंडे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली असता केळीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. समितीच्या अहवालानुसार कोरे बायोटेक बनाना टिश्यूकल्चर लॅब अॅन्ड नर्सरी, जि. सोलापूर यांचे उतीसंवर्धन केळी रोपे वापरलेल्या शेतात २८ ते ७७ टक्क्यापर्यंत मर आढळून आली. कंपनीने निकृष्ट दर्जाची रोपे दिल्याचे अहवालात स्पष्ट केले. ग्राहक पंचायतीद्वारा रवींद्र मराठे यांनी कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र, कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ग्राहक मंचाकडे तक्रार केली. कंपनीद्वारा एन.बी.कलंत्री यांनी बाजू मांडली. तक्रारकर्त्या शेतकऱ्यांनी ४३ लाख १९ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. (प्रतिनिधी)
१५ केळी उत्पादकांना ४३ लाखांची भरपाई
By admin | Updated: September 18, 2014 23:27 IST