(लोगो)
गजानन मोहोड
अमरावती : एक वर्षाच्या आतील चिमुकल्यांना ‘न्यूमोकोकल’ आजारांपासून आता संरक्षण कवच मिळणार आहे. यासाठी राज्यात पहिल्यांदा न्यूमोकोकल कंज्युगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या लसीचे तीन डोस मोफत देण्यात येणार आहे. गतवर्षी पाच राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. यंदा देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात ३२ व्हायल प्राप्त झाले आहेत.
न्यूमोकोकल हा संसर्गजन्य आजार खोकला व शिंकण्याने पसरतो. या आजाराच्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्याने मेनिन्जायटिस, सेप्टिसीमिया आणि न्यूमोनियासारखे गंभीर व सायनिसायटीससारखे सौम्य आजारदेखील होऊ शकतात. हा बॅक्टेरिया पाच वर्षाआतील मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमुख कारण ठरला आहे. या लसीकरणामुळे हा आजार व त्याद्वारे मृत्यू कमी होऊ शकतात. त्यामुळे नियमित लसीकरणामध्ये ‘पीसीव्ही’ लसीची भर पडली आहे. शासकीय रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांतून सर्वसामान्य परिवारातील बालकांना ही लस मोफत उपलब्ध होत आहे. १२ जुलैपासून ही मोहीम जिल्ह्यात सुरू होत आहे. पीसीव्हीच्या एका व्हायलमध्ये ०.५ मिलीचे पाच डोस होतात. द्रव स्वरूपात ही लस दोन ते आठ अंश तापमानात साठविली जाते.
बॉक्स
काय आहे ‘न्यूमोकोकल न्यूमोनिया’
श्वसन मार्गात होणारा हा संसर्ग आहे, ज्यात फुफ्फुसावर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरिरातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो. खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, आजार गंभीर झाल्यास खान्या, पिण्यात अडचण येऊन फिट येऊ शकते. बेशुद्ध होऊ शकतात व मृत्यूदेखील होऊ शकतो.
बॉक्स
या आजाराची लक्षणे
*ओटायसीस, सायनिसायटीस
ताप, कान दुखणे व वाहणे, सायनसच्या भागात दुखणे व नाकातून सतत पाणी येणे
*न्यूमोनिया
ताप, कापरे भरणे, थंडी वाजणे, खोकला, धाप लागणे, श्वसनाची गती वाढणे, छाती खोल जाणे
* मेनिन्जायटिस
ताप, डोकेदुखी, उजेडाचा त्रास होणे, मान आखडणे, फिट येणे, कधी कधी भान हरपणे
* बॅक्टेरिमीया
ताप, आजाराने कापरे भरणे भ्रमिष्ठपणा, संसर्ग पसरल्याने अवयव, निकामी होणे,
पाईंटर
पहिला डोस : सहा आठवड्याचे बालक
दुसरा डोस : १४ आठवड्याचे बालक
तिसरा डोस : नऊ महिन्यांचे बालक