गणेश वासनिक ल्ल अमरावतीनुकत्याच पार पडलेल्या अमरावती महापौरपदाच्या निवडणुकीनंतर राजकीय चित्र पालटले आहे. एकूणच इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी वाढविल्या असून नमांकन दाखल करण्यापूर्वीच मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदारी पायपीट करीत असल्याचे दिसून येते. विशेषत: महापौरपदाच्या निवडणुकीनंतर काहींना राजकीय जीवनदान मिळाले तर काही ‘कोमात’ गेल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटशी हातमिळवणी करुन सत्तावाटपाचे सूत्र ठरविले. आ. रावसाहेब शेखावत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून निष्कासित संजय खोडके यांच्यात अडीच वर्षांपूर्वी सत्तास्थापनेचा झालेला करार पुनर्स्थापित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या वाट्याला महापौर तर काँग्रेसने उपमहापौरपद घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीचे गणित जुळवून आणले. महापालिकेत पहिल्यांदाच महापौर, उपमहापौरपद हे अल्पसंख्याक समुदायाला देण्यात आल्याने काँग्रेस हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत ‘कॅश’ करण्याची व्युहरचना आखणार यात दुमत नाही. मात्र, महापौरपदाची निवडणूक आटोपताच राष्ट्रवादीच्या नेत्या नवनीत राणा यांनी काँग्रेसने राष्ट्रवादीशी दगाबाजी केली, रावसाहेब शेखावतांना येणारी विधानसभा निवडणूक सोपी नाही, असा इशारा देण्यात जराही कसूर सोडला नाही. त्यामुळे राज्यात आघाडी झाली तरी अमरावती मतदारसंघात काँग्रेसला ‘दाखवून’ देण्याची भाषा राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बोलू लागले आहे. परंतु महापौर, उपमहापौरांच्या निवडणुकीनंतर अमरावती मतदारसंघात काँग्रेसने मुस्लिम समाजाला लक्ष्य करुन नव्याने रणनीतीची तयारी चालविली आहे. केलेली विकासकामे, पायाभूत सुविधा, शासनाच्या विविधांगी योजना घराघरांत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी काँग्रेसने सज्ज केली आहे. महापौर, उपमहापौरांच्या निवडणुकीनंतर अमरावती व बडनेरा मतदारसंघातील राजकीय चित्र पालटून गेले आहे.बडनेरा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण असा विस्तारलेला आहे. या मतदारसंघात दलित मतदारांची निर्णायक भूमिका असल्याने सर्वच इच्छुकांनी दलित मतांवर डोळा ठेवून पुढील वाटचाल चालविल्याचे दिसून येते. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र मुस्लिम मतदार हा धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहत असल्याने त्यानुसार काही इच्छुकांनी तशी मोर्चेबांधणी चालविली आहे. महापालिकेतील काही पदाधिकारी ‘खुर्ची’चा फायदा घेत बडनेरा मतदारसंघात नेत्यांसाठी ‘फिल्डिंग’ लावत असल्याचे दिसून येते. प्रभागनिहाय बैठका, ज्येष्ठांचे मेळावे, युवकांच्या भेटीगाठी आदी उपक्रम सुरु झाले आहेत. बडनेरा मतदारसंघात इच्छुकांचे दौरे सुरु झाले असून कार्यकर्त्यांशी संवाद, मर्जी आणि त्यांनी सुचविलेल्या सूचनांचे पालन करण्यात इच्छुक उमेदवार कुचराई करीत नाहीत. महापौरपदाच्या निवडणुकीनंतर काहींना ‘स्वींग’ तर काहींना ‘सेटबॅक’ बसल्याचे चित्र आहे. दरम्यान एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपानेही मतदारांची चांगलीच करमणूक होण्याचे संकेत आहे.
महापौर निवडणुकीनंतर चित्र पालटले
By admin | Updated: September 14, 2014 23:47 IST