गजाननमोहोड - अमरावती
जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्वर), भातकुली व धारणी या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ंऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायत करण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे. यासाठी १ मार्च २०१४ रोजी शासनाने अधिसूचना काढली. आक्षेप नोंदविण्याची अंतिम मुदत ३१ मार्च होती. प्रत्यक्षात ही अधिसूचना जारी झाल्याची कुठलीही सूचना जिल्हा प्रशासनाला नाही. मुदत संपल्यानंतर अधिसूचना अप्राप्त असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविला आहे. तालुक्याचे मुख्यालय असणार्या तिवसा, नांदगाव (खं.), भातकुली व धारणी या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत. नगरपरिषदेसाठी असणार्या २५ हजार लोकसंख्येच्या निकषांमध्ये ही गावे मोडत नसल्याने शासनाने या ठिकाणी ‘क’ दर्जा असणारी नगरपंचायत तयार करण्याची घोषणा विधानसभेत केली. मंत्रिमंडळाचा ठराव पारित झाला. जिल्ह्यातील या नगरपंचायतींसाठी नगरविकास खात्याने १ मार्च २०१४ रोजी अधिसूचना (नोटीफिकेशन) जारी केली. यावर ३० दिवसांत म्हणजेच ३१ मार्च २०१४ पर्यंत हरकती व आक्षेप मागविले. प्रत्यक्षात ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयास अप्राप्त असल्याने जिल्हा प्रशासन अनभिज्ञ राहिले. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने होणार्या या चार नगरपंचायती गलथान कारभारामुळे अधिसूचना प्रक्रियेपासून वंचित राहिल्या. राज्याच्या प्रधान सचिवांनी वस्तूनिष्ठ अहवाल मागविला असल्याची माहिती मिळाली आहे.