अमरावती : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या दहा नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. यासंदर्भात वॉर्डनिहाय रचनेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशाची कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये आता नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचे वेध लागलेले दिसून येत आहे.
जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपालिका माहे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मुदत संपत आहे. काही नगरपंचायती व नगरपालिकांच्या मुदत संपल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील शासकीय निर्णय काय होतो, हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे. यासंदर्भात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याबाबत दिलेल्या आदेश लक्षात घेता, सर्वपक्षीय नेत्यांकडून आता कोणत्या प्रकारची भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. राज्यातील युती शासन काळाचा अपवाद वगळता मागील दोन-तीन दशकांपासून जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांचे नगरपंचायत, नगरपालिकांवर वर्चस्व आहे. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात प्रस्तावित निवडणुका वेळेत झाल्यास आता केवळ शंभर दिवसांचा कालावधी या निवडणुकीसाठी राहिला असल्याने सर्व पक्षातील नगरसेवक पदाकरिता इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीची तयारी व त्यासंदर्भातील जमवाजमव करण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर्भात राजकीय गोटात चर्चाही रंगू लागल्या आहेत.