अमरावती : खरीप २०१३ च्या हंगामात पेरणीपासून अतीपाऊस व काढणीच्या काळात परतीचा पाऊस यामुळे सोयाबीन डागी झाले व त्याची उगवणशक्ती कमी झाली होती. याचा फटका शेतकऱ्यांना खरीप २०१४ च्या हंगामात बसला. उगवणशक्ती कमी असल्याने दुबार पेरणीची वेळ आली. तसेच पेरणीच्या कालावधीत दीड महिना पावसाने मारलेली दडी नंतरही सरासरीपेक्षा कमी पाऊस, यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही व दाणा बारकावला. याचा परिणामदेखील खरीप २०१५ च्या हंगामात होणार आहे. शेतकऱ्यांजवळ आता सोयाबीनचा साठा नाही. आता बाजारभावात ४ हजारांवर भावाने सोयाबीन विकला जात आहे. शेतकऱ्यांनी ३००० ते ३२०० रूपये प्रतिक्विंटल भावाने सोयाबीन विकले. शेतकऱ्यांना आता ७ ते ८ हजार रूपये क्विंटल भावाने सोयाबीनचे बियाणे विकत घ्यावे लागणार आहे. मागील हंगामात सर्वाधिक फसवणूक महाबीजने केली होती. या हंगामातदेखील तीच गत राहणार आहे. शेतकऱ्यांची निकड व बियाण्यांची टंचाई बघता दक्षिणेतल्या बोगस व अप्रमाणित बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत कृषी विभागाने बोगस बियाण्यांना पायबंद घालण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
बोगस बियाण्यांचा होणार शिरकाव
By admin | Updated: May 8, 2015 00:21 IST