नीलेश भोकरे - करजगाव : चांदूर बाजार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे सर्वच भागात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामध्ये डेंग्यू आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांद्वारे ग्रामीण भागात व शहरी आरोग्य केंद्रनिहाय वॉर्डनिहाय, घरोघरी पाहणी केली जात असल्याचे असे चित्र दाखवले जात आहे. तथापि, खासगी दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे.
तालुक्यात १७६ संशयितांचे रक्त तपासले असता २० संशयित, तर १६ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. सध्या १६ डेंग्यू पॉझिटिव्ह शासनदरबारी असले तरी खासगी रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, त्याची नोंद कोठेच नाही किंवा रुग्णदेखील त्याची माहिती समोर आणत नाही. शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक भागातील खुले प्लॉट डास उत्पत्तीची स्थळे बनली आहेत. नागरिकांनी घराशेजारी साचलेले पाण्याचे डबके कोरडे करावे. टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावावी. झोपताना मच्छरदाणी, धूप अगरबत्ती, लिक्विडचा वापर करावा. अशा उपाययोजना करण्याचे आवाहन शासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागात काम करणारे एनएम आणि आरोग्यसेवक हे पाहुणे असल्यासारखे कर्तव्याच्या ठिकाणी जात असून काही तर लोकप्रतिनिधीचा धाक दाखवत गावपुढारीची भूमिका बजावत आहेत. अशांवर कारवाईची मागणी ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.
स्वच्छता अभियानात लाखोंचा खर्च करण्यात येत असला तरी शहरातील कॉलनी भागात तसेच ग्रामीण भागातील स्लम एरियात स्वच्छतेचा लवलेशही दिसत नाही. परिणामी डेंग्यू, मलेरिया, चिकणगुनिया, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तालुक्यात गेल्या महिन्यात ३३ हजार ७११ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात १८९ घरात डांस व अळ्यांचा संचार आढळला. तापाचे १७६ रुग्ण आढळले. यात २० डेंग्यूचे संशयित असले तरी त्यातील १६ पॉझिटिव्ह आढळले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
------------------
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांद्वारे ग्रामीण भागात व शहरी आरोग्य केंद्रनिहाय वॉर्डनिहाय, घरोघरी पाहणी केली जात आहे. डास उत्पत्तीचे स्थान टॅमिफॉसने नष्ट करण्यात येत आहे. आरोग्य सेवक आणि एनएम यांना सूचना देऊ.
- डॉ. ज्योत्स्ना भगत, तालुका आरोग्य अधिकारी
--------------
ग्रामीण भागात आरोग्य सेवेसाठी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, मदतनीस, एनएम यांची नेमणूक केली जाते. मात्र, हे अधिकारी आपल्या कामात कसूर करीत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई करावी.
- गोपाल भालेराव, अध्यक्ष, लोकविकास संघटना