फोटो पी १० सरमसपुरा
परतवाडा : कोरोनाच्या काळात दिवसरात्र सेवा देऊनही स्थानिक पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कुणाकडेही मदत न मागता स्वतःच्या तुटपुंज्या वेतनातून आवश्यक तेवढी रक्कम सर्वांनी गोळा केली आणि एक-दोन नव्हे तब्बल १०० अत्यंत गरीब परिवारांना किराणा साहित्याचे वाटप करून सरमसपुरा पोलिसांनी राज्यात एक आगळावेगळा संदेश देत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला.
कुठलीही सुरक्षा असो; सर्वाधिक ताण पोलिसांवरच. लॉकडाऊनच्या काळात सतत वर्षभरापासून पोलीस फ्रंटलाइन वर्कर म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्याही पलीकडे त्यांच्यातील माणूस सर्वसामान्य गोरगरिबांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र रविवारी दिसून आले. अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलिसांनी स्वतःच्या वेतनातून गोरगरिबांना अन्नधान्यांच्या किटचे वाटप केले. जिल्ह्यात रविवारपासून कडक लॉकडाऊन सुरू झाले. वर्षभरापासून कोरोनाच्या काळात गरिबांचे जीणे पोलिसांनी अनेकदा डोळ्यांनी पाहिले आणि त्यांच्यासाठी मदतीचा हात उठला.
बॉक्स
धान्य किट
लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांचे काय होणार, हाच प्रश्न इतरांप्रमाणे रात्रंदिवस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ड्यूटीवर तैनात असणाऱ्या पोलिसांना पडला. हातावर पोट असलेल्या गरजू, गोरगरीब मजुरांना सरमसपुराचे ठाणेदार जे. आर. शेख यांच्या संकल्पनेतून कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने वेतनातून पैसा गोळा केला. साखर, खाद्यतेल, तूरडाळ, चहा पाकीट, तिखट पाकीट, हळद, मीठ, खोबरेल तेल बाटली व साबण अशा साहित्याची किट १०० गरीब व गरजू परिवारांना वितरित केली.