फोटो ०७एएमपीएच०८ कॅप्शन - चांदूर रेल्वे येथील रायगड प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत आहे.
अमरावती-यवतमाळ-वर्धा : यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यात तिघे, तर चांदूर रेल्वे तालुक्यात एक जण वाहून गेला. तीनही जिल्ह्यातील मुसळधार पावसाने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले असून, नदी-नाले तुडुंब भरले आहेत. अनेक ठिकाणी घरे कोसळल्याची माहिती आहे.
अमरावतीतील अप्पर वर्धा प्रकल्पाची दोन दारे उघडण्यात आली. अचलपूर तालुक्यातील येलकीपूर्णा येथे भिंत पडून गाय ठार झाली. सोमवारी रात्री ७ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील भातकुली, अमरावती, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव रेल्वे या सात तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली.
यवतमाळ : महागाव तालुक्यात दोन, तर बाभूळगावमध्ये एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. बाभूळगाव, कळंब आणि केळापूर या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी सकाळी ८ वाजतापर्यंत ५४ मिमी सरासरी पाऊस झाला. बाभूळगावात विक्रमी ११२.७, कळंब ९३, तर केळापूर तालुक्यात ६५ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. महागाव तालुक्याच्या काळी(दौ)-वसंतनगर मार्गावरील नाल्याच्या पुरात ज्ञानेश्वर मांगीलाल जाधव (२८) व सुरेश सुभाष मेंद्राम (२७) रा.साई (इजारा) हे दोघे वाहून गेले. बाभूळगाव तालुक्याच्या राणी अमरावती येथील संतोष पारिसे (३५) हा यावली नाल्याच्या पुरात वाहून गेला. काही भागात वीज कोसळली. घरांचे अंशत: नुकसान झाले. शेती जलमय झाली आहे.
तीन तालुक्यांत अतिवृष्टी; सहा जलाशय १०० टक्के भरली
वर्धा : जिल्ह्यातील सेलू, देवळी तसेच आर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. आठही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील विमल काळे यांच्या शेतातील विहीर खचली. तर अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून शेताला तळ्याचे स्वरूप आले. सोयाबीन, कपाशी पिकावर याचा विपरित परिणाम होत आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ तर बोर धरण प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत.