पंकज लायदे
फोटो पी १० पिलिया धागा
धारणी : मेळघाटातील धारणी तालुक्यात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. दहा दिवसांत ३२५ ॲटिव्ह कोरोना रुग्ण आढळले असून, एप्रिल महिन्यात एकूण १७९ मृत्यू झाल्याची शासन दप्तरी नोंद आहे. त्यापैकी फक्त १३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे तालुका आरोग्य कार्यालयाने म्हटले आहे.
धारणी तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून सद्यस्थितीत संपूर्ण तालुक्यात कोरोनाचे २७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मार्च महिन्यात ५९ जणांचा मृत्यू, तर एप्रिल महिन्यात १७९ जण तर मे महिन्यात रविवारपर्यंत ५३ जणांच्या मृत्यूची नोंद शासन दप्तरी झाली आहे. त्यापैकी मार्च, एप्रिल महिन्यात १३ कोरोना बाधितांचा मृत्यू, तर मे महिन्याच्या नऊ दिवसांत ५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु तालुक्यातील काही कोरोना बाधित रुग्णांना उपचारार्थ अमरावती कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पैकी काही कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद अमरावती महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
जनजागर हवा
ग्रामीण भागात लग्न सोहळे, तेरवी, दसवा यासह आदिवासी बांधवांच्या नवसाच्या पूोचे सत्र सुरूच आहे. याकरिता प्रशासन फक्त कागदोपत्री घोडे नाचवीत आहे. परंतु ग्रामीण भागातील यंत्रणा सक्षम करणे तेवढेच महत्त्वाचे ठरले आहे.
बॉक्स
खेड्यापाड्यांत तापाची साथ
तालुक्यातील खेड्यापाड्यांत मोठ्या नागरिकांसह चिमुकल्यांना सद्यस्थितीत तापाने चांगलेच ग्रासले आहे. त्या तापात त्यांच्या मते त्यांना कावीळ झाल्यासारखे वाटत असल्याने मोजक्या प्रमाणात औषधोपचार घेतला जात आहे. काही गावातच घरगुती उपचार घेऊन दुरुस्त होण्याचा प्रयत्न करीत आहे.
बॉक्स
पिलियाच्या धाग्याला आदिवासी बांधवांची पसंती
पिलियाच्या उपचाराकरिता आदिवासी बांधवांसह अन्य लोकांनी जंगलातील जडीबुटीने विणलेल्या धाग्याला त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवाजवळ ठेवून गळ्यात घालणे पसंत केले आहे. त्याने शरीरात असलेला ताप व पिलियाची लक्षणे निघून जातात, असे त्यांचे म्हणणे आहे. खेड्यापाड्यांत तो धागा बनविणाऱ्यांकडे सर्वांनी धाव घेतली आहे. तो पिलियाचा धागा घातल्यानंतर जेवणात तिखट, हळद, तेल, मटण हे पदार्थ खाण्यास सात दिवस बंदी घालण्यात येते.