आर्थिक बोजा : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना सूटअमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वगळता राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये म्हणजेच ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये दीड पटीपासून ते तब्बल बारा पटीपर्यंत शुल्कवाढ करण्यात आली आहे पण मोजके आधुनिक उपचारही राज्यातील बोटावर मोजण्याइतक्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. परिणामी अनेक आधुनिक उपचारांची व त्यातही दर्जेदार उपचारांची वानवा असल्यामुळेच बहुतांश ग्रामीण भागातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी उपचारासाठी यावे लागत असल्याचे रोजच सिद्ध होत आहे. जवळजवळ दहा वर्षांनंतर आरोग्य सेवेच्या रुग्ण शुल्कांमध्ये वाढ झाली आहे. बीपीएलसह काही विशिष्ट संवर्गातील व्यक्तींना पूर्वीप्रमाणे आताही सवलत आहे. मात्र इतरांसाठी ही शुल्कवाढ करताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शुल्काच्या बरोबर येण्याच्या हेतूने हे शुल्क वाढवण्यात आल्याचे ५२ पानी जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मुळात यातील किती सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांप्रमाणे मिळतात, हा संशोधनाचा विषय ठरावा, अशी एकंदर स्थिती आहे. त्यातच शुल्कवाढ करताना ती थोडीबहूत करण्यात आलेली नसून चक्क दीडपट, दुप्पट, तिप्पट, चौपट आणि पाचपट आणि अगदी दहापट-बारापटही करण्यात आल्याचे स्पष्ट होते. भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी १६० रूपये शुल्क होते तर आता मात्र २ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच जॉर्इंट रिप्लेसमेंटसाठी पूर्वी ४० हजार रुपये शुल्क होते. आता हेच शुल्क ७५ हजारांपुढे गेले आहे तसेच अनेक आधुनिक व क्लिष्ट उपचार शस्त्रक्रिया निदान चाचण्यांची यादीच या ५२ पानी जीआरमध्ये जाहीर करण्यात आली असली तरी यातील अगदी अत्यल्प आधुनिक उपचार शस्त्रक्रिया चाचण्या या बोटावर मोजण्या इतक्या रुग्णालयामध्ये होतात. त्यामुळेच दररोज जिल्हा सामान्य रुग्णालय, डफरीन, टीबी हॉस्पीटल, सुपर स्पेशालिटी व रुग्णालयामध्ये गाव, तालुक्यासह इतर जिल्ह्यातील तीन ते चार हजार रुग्ण उपचारासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंतच्या असंख्य रुग्णांना दररोज विविध उपचारांसाठी अधिकृतरीत्या रेफर केले जाते. अगदी नैसर्गिक बाळंतपणासाठी किंवा छोट्या शस्त्रक्रियेसाठी रेफर केले जाते. मात्र तिथल्या तिथे रुग्णांना उपचार का केले जात नाही याचा सवाल कधीच विचारला जात नाही. त्यामुळे रुग्णालयात गोरगरिबांना आवश्यक सोईसुविधा पूर्णपणे मिळाव्यात, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे. (प्रतिनिधी)रुग्ण शुल्कवाढ झाली आहे. मात्र बाहेरून औषध साहित्य आणण्यासाठी सांगितले जात नाही. ते नियमात बसत नाही व ते काटेकोरपणे पाळले जाते. - अरूण राऊत,जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती
शासकीय रुग्णालयात बारा पटींपर्यंत शुल्कवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 00:24 IST