अमरावती : चुकीच्या कामाकरिता अनेक जण एकत्रित येतात; मात्र चांगल्या कामासाठी निमंत्रणाची आवश्यकता भासते. समाजहित बाळगल्यास आपले हित आपसूकच साध्य होते, ही महामानवाची प्रेरणा घेऊन नवीन पिढी घडवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आ.ह. साळुंखे यांनी केले. स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बामसेफच्या २७ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला सुरुवात झाल. तीन दिवसीय या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून आ.ह. साळुंके बोलत होते. उद्घाटनाप्रसंगी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष दयारामजी, उदघाटक आ.ह. साळुंखे, डी.के. खापर्डे मेमोरिअल ट्रस्टचे अध्यक्ष झाकर्डे, राज्य प्रचारक एस.एफ.गंगावणे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश खोंदे, राज्य अध्यक्ष बी.बी. मेश्राम, महासचिव जे.एच. चव्हाण उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करुन अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष दयारामजी यांनी सांगितले की, सामाजिक कार्याची मशाल तेवत राहावी या उद्देशाने डि.के. खापर्डे यांनी बामसेफची स्थापन केली होती. या संस्थेअतंर्गत कार्यकर्त्यांनी पुढेही सामाजिक कार्य सुरू ठेवावे यासाठी बामसेफचे कार्यकर्ते संघटितपणे कार्य करीत आहेत. अमरावती ही धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने २७ वे राज्य स्तरीय अधिवेशनाचे आयोजन येथे करण्यात आल्याचे दयारामजी यांनी सांगितले. राज्य अधिवेशनाला सुरुवात करण्याआधी ध्वजारोहण करुन कार्यकर्त्यांनी रॅली काढली. रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर बामसेफतर्फे राज्य अधिवेशन-२०१४ च्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. बामसेफच्या कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन समाजाचा विकास घडवून आणला पाहिजे याकरिता विविध मुद्दावर मान्यवरांनी मार्गदर्शन करित चर्चा केली. यावेळी उद्घाटक आ.ह. साळुंखे यांनी आपल्या वक्तव्यातून एकजुटीचा संदेश देत मार्गदर्शन केले. दिनेश खोंदे यांनी आपल्या भाषणात राज्य अधिवेशनाची पार्श्वभूमी विषद करुन अशा चर्चाचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. एकजुट होऊन ध्येयपुर्तीसाठी आपण आपला सहभाग दर्शवायला हवा, समाजाला मुलभूत गरजा मिळाव्यात या उद्देशाने बाबासाहेबांनी कार्य केले. मात्र आज समाजातील अनेक घटकांमध्ये विषमता निर्माण झाली असून ही विषमता दूर करण्यासाठी आपला प्रयत्न असावा, असेही त्यांनी सांगितले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे प्रास्तविक बामसेफचे राज्य अध्यक्ष बी.बी.मेश्राम, संचालन महासचिव जे.एच.चव्हाण तर आभार मंदा वानखडे यांनी केले.
महामानवाच्या प्रेरणेतून पिढी घडवा- आ.ह. साळुंखे
By admin | Updated: September 13, 2014 23:33 IST