अमरावती : ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, असे संगीताचे स्वरुप आता बदलले आहे. वडाळीच्या वनपरिक्षेत्रात मोरांच्या संख्येत वाढ झाल्याने जवळपास १00 च्या वर मोर नक्षत्र वनात नाचताना दिसत आहे. त्यामुळे ‘नाच रे मोरा नक्षत्र वनात’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. वडाळीच्या जंगलात नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने वन्यप्राण्यांसह पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही बाब निसर्गप्रेमींसाठी आनंददायी ठरत आहे.
वडाळी
वनपरिक्षेत्रात अनेक वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी वडाळीच्या जंगलात नागरिकांचा वावर वाढल्याने वन्यप्राणी व पशुपक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. मात्र सद्यस्थितीत बदल झाला आहे. वडाळीतील बंदीस्त नर बिबट्याच्या पिंर्जयाभोवती जंगलातील मादी बिबट घिरट्या घालत होती. त्यामुळे वडाळी जवळील सर्व परिसरात वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला होता. बिबट्याचा वावर असल्याने वडाळी परिसराच्या सभोवताल वनविभागाने चौकस नजर ठेवली होती. जंगल भागात कोणतेही नागरिक जावू नये, याकडे विशेष लक्ष ठेवले गेले होते. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जाणे बंद केले होते. याचाच परिणाम वडाळीच्या जंगलात आज पाहायला मिळत आहे. जंगलातील वन्यप्राणी व पशुपक्षी मुक्त संचार करताना दिसून येत आहे. पूर्वी नागरिकांचा वावर जंगलात असल्याने वन्यप्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करु शकत नव्हते. मात्र आता वडाळीतील वन्यप्राणी व पक्ष्यांना जंगलात वावरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळत असल्याचे दिसून येत आहे.