अमरावती : अमरावती वन विभागाच्या फिरत्या पथकाने चार आरामशीनवर धाडसत्र राबवून अवैध १७0 घनमीटर लाकूड जप्त केले. त्यामुळे अवैध लाकूड कटाई जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कारवाई
करण्यात आलेल्या आरामशीनमध्ये वरूड परिक्षेत्रातील शेंदूरजना घाटच्या मलकापूर येथील विश्वकर्मा सॉ मिल, वरूड येथील चेतना सॉ मिल, परतवाडा वन परिक्षेत्रातील चांदूरबाजार येथील किसान सॉ मिल, अचलपूर येथील आझाद सॉ मिलचा समावेश आहे. तसेच वणी (बेलखेड) येथे भीमराव बागडे यांच्या राहत्या घरी फर्निचरचे काम सुरू असताना २१ घनमीटर सागवानचे लाकूड जप्त करण्यात आले. हे सागवान नवीन तोडीचे असल्याचा कयास वन विभागाने लावला आहे. या लाकडाची किंमत ७ हजार ९९ रुपये आहे. भारतीय वन अधिनियम १९२७, २६ (फ), ४१, ४२ व ५२ अन्वये बागडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू आहे. अमरावतीच्या
उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक एस. डी. सोनोने यांच्या पथकाने आरामशीनवर धाडसत्र सुरू केले आहे, हे विशेष. आरामशीन तपासणीदरम्यान बहुतांश सॉ मिलवर क्षमतेपेक्षा जास्त लाकूडसाठा असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले आहे. लाकडाचा परवाना नसताना हे लाकूड आरामशीनमध्ये कसे आणले जातात, हा सवाल वन विभागाच्या फिरत्या पथकापुढे उपस्थित होत आहे. आरामशीनमध्ये
अवैधरीत्या आढळलेले १७0 घनमीटर लाकूड जप्त करून सॉ मिल मालकाविरूद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ४७ नियमांतर्गत १९४२ कलम ८६, ६६ अन्वये आर्थिक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वन
विभागाच्या फिरत्या पथकाने पहिल्या टप्प्यात परतवाडा व वरूड वनपरिक्षेत्र टार्गेट केले आहे. त्यानुसार आरामशीनवर धाडसत्र राबवून लाकडाचा असलेल्या साठय़ाची तपासणी केली जात आहे. आडजात लाकडाची कटाई करणार्या आरामशीनवरच सर्वाधिक गैरप्रकार होत असल्याचे फिरत्या पथकाच्या निदर्शनास आले आहे. पुढील टप्प्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव येथील आरामशीनची तपासणी होणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक निनू सोमराज यांनी दिली. (प्रतिनिधी)