उत्पादन खर्च वाढला : शेतकरी हवालदिलमोर्शी: कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात आता शेतकरीच पराधीन झाला असून शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. शेती उत्पादनाचा वाढता खर्च, पावसाचे बिघडलेले अंदाज आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे हा व्यवसाय नुकसानीचा ठरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बहुतेक सधन शेतकरीसुद्धा आता शेती ठेक्याने देण्याचा विचार करीत आहे. ज्यांना शेती करण्याशिवाय पर्यायच नाही व घरचे चार जण शेतीत राबू शकतात, असे शेतकरी शेती ठेक्याने करून परंपरागत व्यवसाय जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे.विदर्भातील ८३ टक्के शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. बहुतांश शेतकर्ऱ्याना दरवर्षी संस्थांकडून किंवा बँकांकडून शेती कर्ज घेऊनच शेती कसावी लागते. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करण्याच्या अटीवर शासन शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देते. तरीही शेतातील लागवडीचा खर्च व उत्पादनातून येणारा पैसा, याचा ताळेबंद तोट्याचाच होतो. त्यामुळे अनेक शेतकरी कजार्चे मुद्दलही भरू शकत नाही.एकदा कर्ज थकले की ते दरवर्षी शेतकऱ्यांच्या डोक्यावर भार बनून राहते. माणसोमाणसी शेती जुगार खेळल्यासारखे आहे. शेतीसाठी आवश्यक बैलजोडीच्या किंमतीही लाखावर पोहोचल्या आहे. शेतीत राबणार्ऱ्या मजुरांची टंचाई होत असल्याने मजुरीचे दरही शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत. बियाणे, खते, कीटकनाशक, तणनाशक यांच्या किंमती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार्ऱ्या ठरल्या आहेत. शेतकऱ्यांची नाड बघून कृषी केंद्रांचे चालक शेतकर्ऱ्यांना लुबाडून त्यांना कंगाल करण्याच्या बेतात असल्याचेही कित्येकदा शेतकर्ऱ्यानी अनुभवले आहे. वर्षभर राब राब राबून वर्षाअखेर सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांंच्या हाती नफा शिल्लक राहतच नाही. त्यामुळे शेती ठेक्याने देऊन एकरकमी पैसा हातात पाडून घेण्याकडे शेतकर्ऱ्यांचा कल आहे.कित्येक वर्षांपासून कापसाचे भाव वाढलेले नाही. त्यामुळे कापूस पिकासाठी लागवडीचा खर्च अधिक, तर उत्पादन कमी, असा जुगार शेतकरी खेळत आहे. दोन वर्षांपासून पीक शेकऱ्यांना दगा देत आहे. सिंचनाची पुरेशी सोय नसल्याने दुबार पीक घेण्याची किमया शेतकऱ्यांना करता येत नाही. शेतकऱ्यांना पैशासाठी बँकांवर अवलंबून राहावे लागते. शेती करण्यासाठी सालदार व मजुरांवर अवलंबून राहवे लागते. शेतमाल विकण्यासाठी दलाल व व्यापारी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेती व्यवसाय परावलंबी बनला आहे? कधीकाळी शेतकऱ्यांकडे गोधन असायचे. त्यापासूनच शेतात राबण्यासाठी बैल तयार व्हायचे. आता चारा-पाण्याची टंचाई, राखणदार गड्याची मजुरी परवडत नसल्याने शेतकऱ्यांकडे गायींची संख्या कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे बैलजोडी म्हातारी झाल्यास शेतकऱ्यांना नव्याने बैलजोडी खरेदी करावी लागते. सर्वसाधारण शेतकऱ्यांना ही खरेदी शक्यच होत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेती ठेक्याने द्यावी लागते. काळ एवढा बदलला की, शेतकऱ्यांनाही पॉकेटचे दुध विकत घेऊन चहा बनवावा लागतो. शेतात टाकायला शेणखत नाही. त्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेती ठेक्याने देण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल !
By admin | Updated: May 30, 2016 00:38 IST