अमरावती : कृषी विभाग, शेतकरी व खासगी कंपनी यांच्यात समन्वय होऊन शेतकरी समूह स्थापित करावे व त्या आधारे यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड करण्यात येणार आहे व उत्पादित कापूस विकत घेण्याची हमीदेखील या खासगी कंपन्या देत आहे. यासाठी शेतकर्यांना बियाणे व कीटकनाशके अनुदानावर मिळणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पिकासाठी हा प्रयोग मागील २ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात कापूस हे हमखास येणारे पीक असल्याने उत्पादनात वाढ व बाजारपेठेमध्ये साखळी निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यात तीन हजारांवर शेतकर्यांचे समूह करण्यात आले आहे. एका समूहात २० शेतकरी आहेत. या माध्यमातून दोन वर्षांत १० हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे. याचप्रमाणे यंदादेखील हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत व राज्य शासनाच्यावतीने ही योजना राबविण्यात येते. दोन वर्षांपूर्वी शासनाने बियाणे व कीटकनाशकाकरिता अनुदान दिले होते. फक्त एका वर्षांसाठी हा प्रकल्प होता. परंतु या प्रकल्पामुळे शेतकर्यांना फायदा होत असल्याने प्रकल्पाला मुदतवाढ दिली आहे. (प्रतिनिधी)
शेतकरी समूहाची कापूस लागवड
By admin | Updated: May 10, 2014 23:59 IST