कावली वसाड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी, सर्व कामे बंद झाल्याने ग्रामीण भागातील मजुरांना जगावे कसे, हा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे एकीकडे मरणाची भीती तर दुसरीकडे जगण्याची चिंता वाढली आहे.
साधारणत: उन्हाळ्याच्या दिवसांत घराचे बांधकाम तसेच अनेक कामे उपलब्ध असतात. परंतु, अनेक दिवसांपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता होती. त्यात शेतमजुरांना कामाची मुभा देण्यात आली होती. परंतु, एकीकडे कोरोनाचे रुग्ण झापाट्याने वाढल्यामुळे मजुरांच्या मनात भीती निर्माण झाली. परिणामी त्यांनी कामावर जाणे टाळले. परंतु, जगण्यासाठी कमावण्याशिवाय अनेक मजुरांकडे पर्याय नाही. त्यामुळे मिळेल त्या कामावर ते जात होते. आता मात्र कडक लॉकडाऊन असल्याने कामावर जावे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.
ना शेतमजुरी, ना धान्य
धामणगाव रेल्वे तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात भुईमूग, तीळ, मूग तसेच कांदा पिकांची पेरणी करण्यात आली. आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना लॉकडाऊनमुळे शेतकरीही अडचणीत सापडला आहे. उन्हाळी पिके काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना बाहेरगावाहून ज्यादा मजुरी देऊन मजूर आणावा लागत आहे.
अनेक नागरिक भाजीपाला तसेच किराणा वेळेवर घेऊन आपली उपजीविका भागवितात. परंतु जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने, सर्व फेरीवाले बंद केल्याने हातावर आणणे व पानावर खाणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकल्याचे चित्र आहे.