अमरावती : जिल्ह्यात दुग्ध, मत्स्य, पशुसंवर्धन या तीनही बाबींमध्ये प्रचंड क्षमता असून उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी रोजगार निर्मितीला प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग, पर्यावरण राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे रविवारी केले.येथील शासकीय विश्राम भवनात आयोजित पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तत्रय मुळे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त प्रकाश उंबरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पी. व्ही. सोळंके, जिल्हा मत्स्यविज्ञान अधिकारी प्रशांत मोहोड, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त आर. डी. कळमकर, आर. एच. राठोड, एस.टी. शेळके, पालकमंत्र्यांचे खासगी सचिव रवींद्र धुरजड, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते. दरम्यान आढावा बैठकीत बोलताना ना. पोटे यांनी दुग्ध, मत्स्य, पशुसंवर्धन व्यवसायातून शेतकरी सुखी करण्याचे स्वप्न आहे. जिल्ह्यात ३५० च्या वर दूग्ध सहकारी संस्था आहेत, त्या केवळ बँकेत जाण्यासाठी वापरल्या जातात.पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय करीत असताना चारा उपलब्धता, दुधाळ जनावरांचा भाकड काळ, जास्त दूध देणाऱ्या व विदर्भातील हवामानाशी जुळवून घेणाऱ्या गायी-म्हशींच्या जाती आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उस्मानाबादी बोकड हा मांसल असल्याने तालुकास्तरावर अशा बोकडांचे वाटप करुन उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. गायीच्या दुधाचे महत्त्व ओळखून अधिकाऱ्यांनी गायीच्या दुधाच्या गुणधर्मांबाबत सामान्य लोकांमध्ये जनजागृती करावी व दुग्ध उत्पादनवाढीसाठी सर्वार्थाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सुमारे १० हजार हेक्टर जलक्षेत्र आहे. मत्स्यबीज उत्पादनापासून मासोळी विक्रीपर्यंत योग्य नियोजन केल्यास पुणे, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये येथील मासळीला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते व त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होऊ शकते. त्यासाठी तातडीने आराखडा बनविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. बैठकीत पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त शैलेंद्र पुरी, रहाटे, कानफाडे, कावरे, डेअरी व्यवस्थापक संपत जांभुळे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ए.ए. खान, प.दे. बसवंत आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथील अमोल झापे यांनी पालकमंत्र्यांना मेळघाटातील स्ट्रॉबेरी उत्पादन या विषयावर माहिती दिली. (प्रतिनिधी)
दुग्ध, मत्स्य, पशुसंवर्धन व्यवसायातून रोजगार
By admin | Updated: February 8, 2015 23:27 IST