सांडपाणी, नळाची कायम समस्या : पवन, गजानननगर, अंजू कॉलनीसह परिसरातील नागरिक त्रस्तअमरावती : महापालिकेचा अखेरचे टोक असलेला हा बडनेरा परिसर मागील १५ ते २० वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. आता कुठे विकास कामे व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र या परिसरात नालीची कायम समस्या आहे. कुठे नाल्या आहेत, तर कुठे नाहीत. सफाई कामगार नियमित येत नाहीत. नाल्या तुंबल्यात, सांडपाण्याची अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. उन्हाळ्यातच ही स्थिती आहे. पावसाळ्यात तर सांडपाण्याच्या गटारांमुळे वराहांचा उच्छाद असतो. याला नागरिक कंटाळलेत, दुर्गंधी व मच्छरांचा वाढता त्रास यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत.परिसरातील नाल्यांची सफाई केल्यानंतर हा कचरा डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या काठावर बरेचदा टाकला जातो. त्यामुळे ही नवीन डोकेदुखी या परिसरात वाढीस लागली आहे. नागरिकांनी ही समस्या नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु अजून या समस्येच्या दुर्लक्ष केल्या गेल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नळ आहेत, परंतू नळ सोडण्याचे टायमींग नाही. रात्री १ वाजल्यानंतर नळ येतात. याला नागरिक वैतागले आहे. झोप सोडून पहिले पाणी भरावे लागते, नळ आला नाही तर याला पर्याय केवळ हापसी आहे. नागरिकांनी पाणी कोठून भरावे अशी स्थिती आहे. सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत त्यामुळे हजारो लिटर पाण्याच्या अपव्यय होतो. लेआऊटमधील ओपन स्पेस विकसित नाही, त्या ठिकाणी बगीच्या व्हायला पाहिजे, मुलांना खेळायला मैदान नाहीत. महिलांना योगाकरिता किंवा महिला बचत गटांच्या माध्यमातून सामूहिकरीत्या एखादा कार्यक्रम करायचा असल्यास याठिकाणी सामूहिक व्हॉल असायला पाहिजे. मात्र या समस्येकडे नगरसेवक वा महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा नाहीत, बसायला बेंच नाहीत, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा असायला पाहिजे, ज्या ठिकाणी बेंच आहेत ते ज्येष्ठ नागरिकांच्या सोईचे नाहीत.अनेक पथदिवे नादुरुस्त आहेत. कित्येक दिवस दुरुस्त केली जात नाही. नगरसेवकांचे याकडे लक्ष द्यायला पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. या परिसरात विजेच्या दाबाची समस्या आहे. कधी विजेचा कमी दाब, तर कधी उच्च दाब असतो. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील विजेची उपकरणे खराब झाली आहेत. तेथे रात्रीच्या वेळी परिसरात अवैध व्यवसाय चालतात, असा नागरिकांचा आरोप आहे.परिसरातील मैदानात असलेल्या मंदिराजवळ पथदिवा नाही. येथील दोन्ही फाटक तुटलेली आहेत. बरेचदा मेलेली वराह, कुत्रे या परिसरात आणून टाकले जातात. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. आरोग्याची समस्या निर्माण होते. गेल्या दोन दशकापासून दुर्लक्षित असलेल्या या परिसरातील विकासकामे अलीकडेच व्हायला लागली आहे. परंतु अनेक समस्या अजूनही बेदखल असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
नालीतील कचरा रस्त्यावर, वराहांचा उच्छाद
By admin | Updated: May 26, 2016 01:21 IST