४० टक्के ग्राहक : वीजचोरीसाठी बनावट रिमोट कंट्रोलअमोल कोहळे पोहरा बंदीवीजचोरीला आळा घालण्यासाठी वीज मंडळातर्फे इलेक्ट्रिक मीटरनंतर डिजिटल मीटर लावण्यात आले. वीजचोरट्यांनी यावरही उपाय शोधून काढला असून डिजिटल मीटर ‘फुल प्रुफ’चा दावा फोल ठरविला आहे. डिजिटल मीटरमधून वीजचोरीसाठी आता विशिष्ट बनावट रिमोट कंट्रोल वापरण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.अलीकडे वीजचोरट्यांवर संक्रांत आली आहे. वीजचोरीला आळा घालण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे धाडी टाकण्यात येत असून या माध्यमातून लाखो रुपयांची वीजचोरी उघडकीस येत आहे. वीजचोरीमुळे वीज मंडळाला दरवर्षी लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. वीज चोरट्यांवर आळा घालण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे नाना प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या भागातील विद्युत मीटर ‘फॉल्टी’ आहेत त्या भागातील विद्युत मीटर एक विशिष्ट विद्युत खांबांवर एकत्रित लावण्याची महीम वीज वितरण कंपनीने आरंभली आहे. त्यामुळे देयकातील अनियमितता वर्तविण्यात येत आहे. अलीकडेच इलेक्ट्रिक मीटरमधून वीजचोरी होत असल्यामुळे विद्युत मंडळाने आता नवीन डिजिटल मीटर लावणे सुरू केले आहे. हे मीटर १०० टक्के ‘फुलप्रूफ’ असल्याचा दावाही वीज मंडळाने केला आहे. मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वीजचोरट्यांनी डिजिटल मीटरमधून वीजचोरी करण्याची शक्कल लढविली आहे. शहरातील औद्योगिक ग्राहकांकडे सध्या डिजिटल मीटर लावण्यात आले असून हळूहळू हे मीटर सर्व सामान्यांच्या घरातसुध्दा लावण्यात येतील. मात्र वीजचोरी करणाऱ्यांनी या मीटरमधूनसुध्दा वीजचोरी सुरू केली आहे. यासाठी विशिष्ट प्रकारचा रिमोट कंट्रोेल फॉर्म्युला वापरण्यात येत आहे. शहरात पाच हजार रुपये किमतीचे रिमोट बाजारात विक्रीला आले असून या रिमोटशी जुळवून घेणारी कीट डिजिटल मीटरमध्ये बसविण्यात येते. या माध्यमातून डिजिटल मीटरचे रीडिंग कमी करून वीजचोरी करण्यात येत आहे. हा रिमोट कंट्रोल टीव्ही रिमोट कंट्रोलच्या आकाराचा असून याची निर्मिती करणाऱ्यांचा मोबाईल नंबरसुद्धा विशिष्ट ठिकाणी मिळत आहे. डिजिटल मीटरमधून वीजचोरी करण्याचा नवीन ‘फंडा’ वीज चोरट्यांनी अवलंबविल्यामुळे आता वीजचोरीवर आळा घालण्यासाठी कोणते मीटर वापरावे, हा यक्ष प्रश्न वीज मंडळासमोर उभा ठाकला आहे.अशी आहे रिमोटची रचनाविजेचे वाढते दर उद्योजकांसह सामान्यांनाही अस्वस्थ करीत आहे. त्यामुळे बचतीच्या उद्देशाने या रिमोटची संकल्पना चोरट्या मार्गाने उदयास आली आहे. एका प्लास्टिकच्या २ इंच बाय ५ इंच आकाराच्या डब्यात एक कीट बसविली आहे. कोपऱ्यात लाल बटन बसविण्यात आले आहे. डब्यातून दोन केबल बाहेर काढण्यात आले असून त्यांना मध्ये काचेची नळी जोडलेली आहे. रिमोट इलेक्ट्रिक मीटरच्या दिशेने ठेवून लाल बटन दाबल्यास मीटर रीडिंग बंद होते. त्यामुळे महिन्याचे ३००० रीडिंग होणाऱ्या वीजग्राहकांचे १०० होतात. याची विक्री छुप्या मार्गाने घरगुतीसाठी ३ ते ५ हजारांपर्यंत, तर औद्योगिक मीटरसाठी २० ते ५० हजारांत सुरू असल्याचे कळते.
डिजिटल मीटर ‘फुल प्रूफ'चा दावा फोल
By admin | Updated: November 16, 2015 00:23 IST