दर्यापूर : लगतच्या पेठ इतबारपूर येथील एका महिलेचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप करीत महिलेच्या संतप्त नातेवाइकांनी दवाखान्यात गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दर्यापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धावत घेत डॉक्टरला वाहनात बसवून ठाण्यात आणले. यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.
महिला आजारी असल्याने कुटुंबीयांनी अकोट रोडवरील एका खासगी दवाखान्यात उपचाराकरिता तीन दिवसांपूर्वी भरती केले होते. रविवारी सकाळी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. कुठलाही गंभीर आजार नसताना अचानक मृत्यू झाल्याने त्यामागे डॉक्टरचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. शिवीगाळ होत असल्याने डॉक्टरचा मुलगा जमावासमोर आला. संतप्त जमावाने त्याला चोप दिला. नातेवाइकांचा आरडाओरड सुरू असताना शेकडो लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. त्यामुळे अकोट-दर्यापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टरांना पोलीस गाडीत बसवून सुरक्षित पोलीस ठाण्यात आणले. पाठोपाठ महिलेचे नातेवाइकसुद्धा पोलीस ठाण्यात आले. या प्रकरणात कुणीही तक्रार दाखल केली नसल्याचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी सांगितले.
200921\20210920_152136.jpg
महिलेच्या मृत्यूनंतर दर्यापूरातील खाजगी दवाखान्यात नातेवाईकांचा तुफान राडा..( पोलिसांच्या सुरक्षेत डॉक्टरला ठाण्यात नेले )