धामणगाव (रेल्वे) : पोटाला चिमटा घेत जन्मदात्यांनी शिकविले. आजची गरिबी उद्या सुशिक्षित मुलाकडून दूर होऊन वैभव मिळेल, असे मनाशी स्वप्न बाळगले. परंतु एकही मोठा उद्योग नसून रोजगाराची संधी नसल्याने तालुक्यात बेरोजगारांची फौजच तयार झाली आहे. शासनाच्या श्रावणबाळ योजनेचा लाभ घेणारे आई-वडील उतरत्या वयात मुलाच्या नोकरीच्या आधाराच्या प्रतीक्षेत आहेत.धामणगाव तालुक्याची लोकसंख्या १ लाख ३३ हजार ६५१ आहे़ दरवर्षी २५ माध्यमिक शाळेतून आठशेच्यावर विद्यार्थी उत्तीर्ण होतात कनिष्ठ महाविद्यालयामधून सातशे विद्यार्थी पुढील शिक्षण घेतात़ आयटीआयमधून प्रमाणपत्र घेऊन तीनशे विद्यार्थी बाहेर पडतात. पदवीधरांची संख्या दरवर्षी दोनशेच्या आकड्याने वाढते़ डीएड, बी.एड, कृषी पदवीधारकांची संख्या वर्षाला ८५ च्या आकड्याने वाढत आहे़ मागील पाच वर्षांत केवळ ३७ युवकांना शासकीय नोकरी लागली आहेत़ दरवर्षी बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ होत आहे़ व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या एक टक्का शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना पुण्यात मुंबईत नोकरी मिळाली डीएड, बी.एड., बीपी.एड, एम़एस्सी़ ,एम़एड या पदव्युत्तरांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे़ बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा व्हावा, स्वयंनिर्भर व्हावे म्हणून शासनाने काही योजना अमलात आणल्या. परंतु तालुक्यात या योजनेचा बोजवारा उडाला आहे़ एकीकडे श्रावणबाळ अर्थसहाय्य योजनेतून वृध्दांना अर्थसहाय्य महिन्याकाठी मिळते़ परंतु लाखो रूपये शिक्षणासाठी खर्च करून रोजगाराची संधी उपलब्ध झाली नाही़ उच्च शिक्षण घेतल्यामुळे कोणती कामे करावी, असा प्रश्न या बेरोजगार युवकांना पडला आहे़धामणगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६३ हजार ३६१़०६ आर आहेत़ ६२ ग्रामपंचांयती, ७ महाविद्यालये १०५ शाळा साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्के आहेत़ धामणगाव तालुक्यात औद्योगिक क्षेत्र म्हणून जळगाव आर्वी जवळ एमआयडीसी परिसर म्हणून ९९़३५ हेक्टर जागा मागील २५ वर्षांपूर्वी संपादित केली आहे़ येथील सूतगीरणीचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे़ ज्या शेतकऱ्यांनी अल्प किमतीत त्यावेळी शेत जमिनी दिल्यात. आपल्या सुशिक्षित मुलांना नोकरी मिळेल, असे त्यांचे स्वप्न आज स्वप्नच राहिले आहेत़ ८० हेक्टर जागा रिक्त आहे़ आज अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत असल्याने रब्बी हंगामात गहू चांगल्या पध्दतीने पिकतो तसेच या पाण्यावर या परिसरात एखांदा मोठा उद्योग उभा राहिल्यास बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो़ तालुक्यातील रोजगारांना प्रशिक्षण देऊन बँकांच्या पतपुरवठ्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे़ लघु उद्योग मंडळाकडून लघु उद्योग उभारणीला मार्गदर्शन करण्यात, अशी मागणी बेरोजगार युवकांकडून होत आहे़ (तालुका प्रतिनिधी)
धामणगावात बेरोजगारांची फौज
By admin | Updated: September 17, 2014 23:30 IST